मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी आमदार व माजी मंत्री बाबा सिद्धीकी यांच्या हत्येसह सिनेअभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी वॉण्टेड पाहिजे आरोपी अनमोल लविंदरसिंग बिश्नोई ऊर्फ भानू ऊर्फ भाईजी ऊर्फ एबी भाई याला अमेरिकेत अटक करण्यात इंटरपोल पोलिसांना यश आले आहे. त्याला बुधवारी भारताच्या हवाली केले जाईल.
प्रत्यार्पणानंतर त्याचा ताबा आधी दिल्ली आणि नंतर मुंबई पोलिसाकडे दिला जावू शकतो. सिनेअभिनेता सलमान खान हा बिष्णोई टोळीच्या टार्गेटवर आहे. जरब बसवण्यासाठी सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीसह इतर आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली होती. ही घटना ताजी असताना 12 ऑक्टोंबर 2024 रोजी अनमोलच्या आदेशावरुन बाबा सिद्धीकी यांची वांद्रयातच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.
याच हत्येत अटक झालेल्या 27 आरोपींवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. या हत्याकांडात फरार घोषीत आरोपींमध्ये मोहम्मद यासिन अख्तर ऊर्फ मोहम्मद जमील ऊर्फ जिशान अख्तर ऊर्फ मोहम्मद जसीन ऊर्फ अख्तर ऊर्फ जुल्मी ऊर्फकेही ऊर्फ जस्सी, शुभम रामेश्वर लोणकर ऊर्फ शुब्बू आणि अनमोल लविंदरसिंग बिश्नोई ऊर्फ भानू ऊर्फ भाईजी ऊर्फ एबी भाई यांचा समावेश आहे.
बाबा सिद्धीकी हत्येसह सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणात अनमोल हा मुख्य आरोपी आहे. तो कॅनडा आणि अमेरिकेत वास्तव्यास असल्याने मुंबई पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस जारी केली असताना त्याला अमेरिकेतून अटक करण्यात यश आले. त्याच्या प्रत्यार्पपणासाठी दोन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्याच्याकडे पोलिसांना एक रशियन पासपोर्ट सापडला असून तेो बोगस दस्तावेज सादर करुन मिळविल्याचे उघडकीस आले आहे.