

मुंबई ः महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू होताच पक्षप्रवेशांना उधाण आले आणि शिवसेना-भाजप या महायुतीच्या मुख्य घटक पक्षांमध्येच पदाधिकारी व नेत्यांची खेचाखेच सुरू झाली. हे पक्षप्रवेश शह-काटशह देण्याच्या पातळीवर पोहोचल्याने मंगळवारी त्याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले; मात्र नाराजी व्यक्त करण्यासाठी उपसलेले मंत्री बहिष्काराचे हत्यार शिंदे गटावरच उलटले असे दिसते.
भारतीय जनता पक्षात नव्या नेत्यांना पक्षप्रवेश दिले जाणे हे नवे राहिलेले नाही. तो रोजचा कार्यक्रम झाला आहे. कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ असे चौफेर पक्षप्रवेश भाजपमध्ये सुरू आहेत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शह देणारे काही प्रवेश भाजपने करताच सेनेकडूनही काटशह देणे सुरू झाले. या प्रवेशांना ऑपरेशन लोटसचे स्वरूप आले. त्याला उत्तर म्हणून शिवसेनेने खासकरून ठाणे जिल्ह्यात ऑपरेशन टायगर हाती घेतले. मात्र हा संघर्ष विकोपाला जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आक्रमक पवित्र्याने तूर्त मिटला असे चित्र आहे.
उल्हासनगर महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता येणार असे दिसताच तिथे शिंदे गटाने टीम कलानीशी हातमिळवणी केली आणि संयुक्त ऑपरेशन टायगर हाती घेत भाजपचे सहा नगरसेवक टीम ओमी कलानीच्या ‘दोस्ती का गठबंधन’मध्ये आणून बांधले. भाजपच्या रणनीतीला सेनेने हा धक्का दिल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दुखावले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज झाले.
सेनेच्या या फोडाफोडीला उत्तर देत ठाकरे सेनेचे माजी जिल्हाप्रमुख राहिलेले शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. याच म्हात्रेंनी रवींद्र चव्हाणांच्या विरोधात विधानसभा लढवली होती. त्यांच्या भाजप प्रवेशाने कल्याण-डोंबिवलीतील समीकरणे बदलली. या पाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतही शिंदे सेनेला भाजपने मग खिंडार पाडले. 25 वर्षे शिवसेनेचे काम केलेले ज्येष्ठ नगरसेवक दिवंगत वामन म्हात्रे यांचे चिरंजीव अनमोल म्हात्रे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपचे कमळ हाती घेतले. त्यानंतर काहीच तासांत माजी नगरसेवक डॉ. सुनीता पाटील, महेश पाटील, सायली विचारे यांनी समर्थक पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात 17 नगरसेवक भाजपमध्ये आले, तर भाजपचे 9 नगरसेवक सेनेत गेले. ठाण्यासह संभाजीनगर, नाशिक, रायगड, जळगावमध्येही भाजपने शिंदे सेनेच्या गडांना सुरूंग लावला. संभाजी नगरात मंत्री संजय शिरसाट यांचे विरोधक असलेले सेनेचे स्थानिक नेते राजू शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. मालेगावात मंत्री दादा भुसे यांच्यानंतर गेल्या विधानसभेला दुसऱ्या क्रमांकाची मते घेणारे बारा बलुतेदार मित्रमंडळाचे अध्यक्ष बंडूकाका बच्छाव यांचाही भाजप प्रवेश याच महिन्यात होऊ घातला आहे. त्याआधी भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे यांच्या हाती भाजपने कमळ ठेवले.
हिरे याचा प्रवेश रोखण्यासाठी शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी आटोकाट प्रयत्न केले; मात्र त्यांना यश आले नाही. सातारा जिल्ह्यात मंत्री शंभूराज देसाई यांचे विरोधक सत्यजित पाटणकरही शरद पवारांची राष्ट्रवादी सोडून भाजपात दाखल झाले.
सुरुवात शिंदे गटाने केली आणि भाजपने मग पक्षप्रवेशांचे धुमशान करत स्थानिक निवडणुकांचे समीकरणच बदलवून टाकले. यातून अस्वस्थ झालेले शिंदे गटाचे मंत्री मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. उदय सामंत, प्रताप सरनाईक, दादा भुसे, संजय शिरसाट, प्रकाश आबीटकर, भरत गोगावले, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील हे मंत्री निरनिराळी कारणे देत मंत्रिमंडळ बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यांचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेवढे बैठकीस उपस्थित होते.
यातून बहिष्काराची चर्चा होईल आणि भाजपवर दबाव येईल, असा शिंदे गटाच्या मंत्र्यांचा अंदाज असावा. मात्र त्यांनतर झालेल्या मुख्यमंत्री भेटीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनाच चार शब्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून ऐकावे लागले.