Anjali Damania On Chakankar pudhari
मुंबई

Anjali Damania On Chakankar: कर्माची फळं मिळाली... चाकणकरांचा राजीनामा मुंडेंना समर्पित करायला हवा... दमानियांची टोलेबाजी

Anirudha Sankpal

Anjali Damania On Chakankar: भांदू बाबा अशोक खरातविरूद्ध लैंगिक छळाचे गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याशी संबंधित असलेल्या राजकीय व्यक्तींची नावे देखील बाहेर येऊ लागली. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर तर अशोक खरातला गुरू मानत होत्या. या त्यांच्या गुरूचे अनेक कारनामे सीसीटीव्ही व्हिडिओद्वारे बाहेर आल्यानंतर चाकणकरांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.

मात्र त्यांनी जरी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. अखेर आज त्यांना याही पदाचा राजीनामा द्यावा लागला. चाकणकर यांनी राजीनामा द्यावा यासाठी अंजली दमानिया, सुषमा अंधारे आणि रूपाली ठोंबरे यांनी देखील जोरदार मागणी केली होती. चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर आता अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकांच्या दबावामुळं दुसऱ्या पदाचा राजीनामा

माध्यमांशी बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, 'रूपाली चाकणकर यांनी शेवटी दुसऱ्या पदावरूनही राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार त्यांनी पहिल्या पदाचा राजीनामा दिला होता, तर दुसऱ्या पदावरून त्यांना लोकांच्या दबावामुळे राजीनामा द्यावा लागला.'

त्या पुढे म्हणाल्या, 'राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी आक्षेप घेतल्यामुळे हा राजीनामा घ्यावा लागला. खरं तर इतका उशीर व्हायला नको होता.'

डॉ. संपदा मुंडेंना राजीनामा समर्पित

अंजली दमानिया यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणात रूपाली चाकणकर यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केली होती त्याची आठवण करून दिली. दमानिया म्हणाल्या की, 'हा राजीनामा डॉ. संपदा मुंडे यांना समर्पित करायला हवा होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर जे आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, तो अत्यंत चुकीचा होता. त्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळाले आहे. अनेक महिलांना यातून वेदना सहन कराव्या लागल्या. अनेक प्रकरणे दाबली गेली आणि महिलांचे दुःख दुर्लक्षित करण्यात आले.'

कर्माची फळं मिळाली

चाकणकरांना त्यांच्या कर्माची फळं मिळाल्याचंही त्या म्हणाल्या, 'या सर्व कर्मांचे फळ रूपाली चाकणकर यांना मिळाले आहे. अशोक खरात यांच्या मदतीने त्या राजकारणात पुढे गेल्या, मात्र ते अत्यंत चुकीचे होते. स्त्रीने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर पुढे यायला हवे.'

अंजली दमानिया यांनी सुनील तटकरे यांच्यावर देखील टीका केली. त्या म्हणाल्या, 'त्यांना वाचवणारे एकमेव व्यक्ती म्हणजे सुनील तटकरे होते. लोकांचा तीव्र विरोध असतानाही त्यांना वारंवार वाचवण्यात आले आणि त्यात सुनील तटकरे यांची भूमिका महत्त्वाची होती.

जरी रूपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला असला तरी अंधारे, दमानिया आणि ठोंबरे यांनी चाकणकरांना अशोक खरात प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली आहे. ठोंबरे यांनी तर चाकणकरांना अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT