मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा विविध राजकीय नेत्यांवर आणि सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधातील लोकायुक्त तक्रारीपासून ते अजित पवारांच्या संपत्तीपर्यंत आणि भाजपने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेपासून ते स्विस बँकेतील वाढलेल्या भारतीयांच्या पैशांपर्यंत, अनेक गंभीर विषयांवर त्यांनी रोखठोक मते मांडली. त्या (दि.२०) आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांबद्दल लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली होती व त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. यावर लोकायुक्तांनी आदेश पारित केला असून, दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तीन आठवड्यांच्या आत माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होणार असून, संबंधित माहिती कृषी विभागाला पाठवण्याचे निर्देशही लोकायुक्तांनी दिले असल्याचे दमानिया यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एका व्हिडिओ ट्विटचा संदर्भ देत, दमानिया यांनी त्यांच्यावरही टीका केली. "अजित पवार हे इतरांच्या भ्रष्टाचाराबद्दल प्रश्न विचारतात. त्यांना विचारायचं आहे की, तुम्ही देखील एकेकाळी शेतकरी होतात, मग तुमच्याकडे एवढी अफाट संपत्ती आली कुठून? ही संपत्ती सिंचन घोटाळ्यातून किंवा साखर कारखान्यांच्या माध्यमातून जमा झाली आहे का? त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही," असा थेट सवाल दमानिया यांनी केला.
भारतीय जनता पक्षावरही (भाजपा) त्यांनी सडकून टीका केली. "भाजप हा अत्यंत परिवर्तन घडवणारा पक्ष आहे. त्यांनी विरोधी पक्षच संपवून टाकला आहे आणि भ्रष्टाचारही संपवला आहे," असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. "ज्या एकनाथ खडसेंच्या मागे लागून बडगुजर यांनी आक्रोश केला, सलीम आणि दाऊदशी संबंध जोडले गेले, त्या खडसेंनाच भाजपाने पक्षात घेतले. अशा लोकांना पक्षात घेऊन ते आपल्याच जुन्या लोकांना बाजूला सारत आहेत," अशी टीकाही त्यांनी केली.
'बोईंग' नावाच्या एका डॉक्युमेंटरीचा संदर्भ देत, अंजली दमानिया यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळातील विमान खरेदी व्यवहारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "एअर इंडियाने सहा विमाने विकत घेतली होती. यासंबंधीची सर्व कागदपत्रे उपलब्ध असताना जर प्रफुल्ल पटेल यांनी ही विमाने खरेदी केली असतील, तर हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे," अशी मागणीही दमानिया यांनी केली.
स्विस बँकेतील भारतीयांच्या वाढलेल्या पैशांवरूनही दमानिया यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. "२०१४ पासून ज्या घोषणा आपण ऐकत आलो, त्यातील ही एक मोठी घोषणा होती (काळा पैसा परत आणण्याची). मात्र, २०२४ पर्यंत हे पैसे तिपटीने वाढले आहेत. माझी पंतप्रधान आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, हे पैसे भारतात परत यायला हवेत. प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाखांऐवजी आता ४५ लाख रुपये जमा करा," असा खोचक टोला त्यांनी लगावला.
वसईतील एका १९ वर्षीय तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन तेंडुलकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "२८ तारखेला ही घटना घडली असून, तेंडुलकर हे पोलिसांना धमकावत असल्यामुळे या प्रकरणात कोणतीही कारवाई होत नाहीये. आरोपी मुलाला पोलीस अटक करत नाहीत, उलट त्याला संरक्षण दिले जात आहे. पीडित मुलीला न्याय मिळत नसल्याने आपण पोलीस आयुक्तांची (सीपी) भेट घेतली आहे," असे दमानिया यांनी सांगितले.
अनेक नेत्यांना मिळत असलेल्या 'क्लीन चिट'वरूनही त्यांनी टीका केली. "सध्या सर्वांना क्लीन चिट दिली जात आहे. भाजप आणि छगन भुजबळ यांची छान जवळीक झाली आहे. त्यामुळे आता सगळीकडे आनंदी आनंद आहे," असा टोमणा त्यांनी मारला.
करुणा मुंडे प्रकरणी आलेल्या न्यायालयाच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. "अखेर करुणा मुंडे यांना न्याय मिळाला. यावरून धनंजय मुंडे यांची प्रवृत्ती कशी आहे, हे लोकांसमोर आले आहे. त्यांनी आता ते मूल त्यांचे असल्याचे मान्य केले आहे, मात्र पोटगीचे पैसे जमा करू शकत नाहीत, असे ते म्हणत आहेत. न्यायालयाने त्यांना जो आदेश दिला आहे, तो अत्यंत चांगला असून त्याचा आपल्याला आनंद आहे," असेही त्या म्हणाल्या.