

पुणे: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आणखी एक मोठा दावा केला आहे. हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या वडिलांकडून पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने 1 लाख रुपये घेतले असल्याचा दावा दमानिया यांनी एक्सवर पोस्ट करीत केला आहे.
दमानियांच्या दाव्यानुसार, वैष्णवी आणि शशांक यांच्या लग्नात ’रुखवत’ हे वधूच्या माहेरच्यांनी करू नये, ते शशांकच्या मामी (पूनम जालिंदर सुपेकर) करतील, असे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरच्यांना सांगितले. असे सांगून हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या वडिलांकडून 1 लाख रुपयांचा धनादेश आणि 50 हजार रुपये रोख, असे एकूण दीड लाख रुपये वसूल केल्याचे सांगितले. (Latest Pune News)
अंजली दमानिया यांनी हा घ्या एक मोठा पुरावा, असे म्हणत एक्सवर पोस्ट करीत हा दावा केला आहे. त्यांनी प्रश्न विचारला आहे की, दूरच्या नातेवाइकांना कोणी पैसे द्यायला सांगतात का? यातून त्यांनी हगवणे कुटुंबाच्या हेतूंवर आणि आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यासोबत दमानिया यांनी बँकेचे स्टेटमेंट जोडले आहे. ज्यात पूनम जालिंदर यांच्या बँक खात्यात एक लाखांचा व्यवहार झाल्याचे दिसत आहे.