Anil Parab Sai Resort Case pudhari
मुंबई

Anil Parab Sai Resort Case: साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब यांची निर्दोष मुक्तता; खेड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

Anirudha Sankpal

Anil Parab Sai Resort Case: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मुरुड येथील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शिवसेना नेते तथा रत्नागिरीचे माजी पालकमंत्री, माजी मंत्री अनिल परब यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालामुळे गेल्या काही वर्षांपासून गाजत असलेल्या प्रकरणाचा अखेर पडदा पडला आहे.

या प्रकरणात तत्कालीन उपविभागीय प्रांताधिकारी, महसूल अधिकारी तसेच मुरुड येथील तत्कालीन सरपंच यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड विधान कलम 420, 120(ब), 177, 182, 290, 34 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 12, 13, 14 अंतर्गत आरोप ठेवण्यात आले होते.

सरकार पक्षाच्या मते, संबंधित रिसॉर्टची इमारत पूर्ण नसतानाही कर आकारणी करून शासनाची फसवणूक करण्यात आली. तसेच खरेदीखतामध्ये इमारतीचा समावेश करूनही योग्य स्टॅम्प शुल्क न भरता शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्यात आला. याशिवाय सीआरझेड (CRZ) प्रतिबंधित क्षेत्रात बांधकाम, अकृषी परवानगीसाठी बनावट सह्या आणि विजेचा मीटर मिळवण्यासाठी खोट्या कागदपत्रांचा वापर केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते.

दरम्यान, बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. सुधीर शरद बुटाला यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद सादर करत “जमीन आणि बांधकाम हे स्वतंत्र घटक असून भारतातील कायदा वेगळा आहे,” असा मुद्दा मांडला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे साई रिसॉर्ट प्रकरण राज्यभर चांगलेच गाजले होते. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी या प्रकरणावरून माजी मंत्री अनिल परब यांना लक्ष्य करत जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू केली होती. त्यामुळे हे प्रकरण केवळ कायदेशीरच नव्हे तर राजकीय दृष्ट्याही अत्यंत चर्चेत राहिले.

आता न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने राजकीय क्षेत्रात नव्या चर्चांना उधाण आले असून, या प्रकरणाचा शेवट कायदेशीरदृष्ट्या झाला असला तरी त्याचे पडसाद राजकारणात उमटत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT