Andheri Manhole Death Pudhari
मुंबई

Andheri Manhole Death: साकीनाका मॅनहोल दुर्घटना चौकशी अहवाल गुलदस्त्यातच

या निष्काळजीपणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

पुढारी वृत्तसेवा

प्रकाश साबळे

मुंबई: अंधेरी साकीनाका येथील खैरानी मार्गावर २ जुलै रोजी उघड्या मॅनहोलमध्ये पडून असलम इसाक शेख (५५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी एल विभागातील सहाय्यक आयुक्त आणि तीन अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित केले होते.

आणि १० दिवसांत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आता या दुर्घटनेला २० दिवस उलटले असतांनासुद्धा मॅनहोल दुर्घटनेचा चौकशी अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. तो मुंबईकरांसाठी सार्वजनिक कधी करण्यात येईल, असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

खैरानी रोडवर मलनिस्सारण विभागाकडून मॅनहोलवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान रस्त्यावरून चालत असतांना असलम इसाक शेख हे उघड्या मॅनहोलमध्ये पडले होते आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पावसाच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे ते मॅनहोलमध्ये वाहून गेले होते. शोधमोहिमेनंतर दुसऱ्या मॅनहोलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या निष्काळजीपणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

चेंबूरमधील झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशी अहवालावरून महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि चौकशी समितीविरोधात संताप व्यक्त केला होता.

एवढेचं नव्हे तर गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत सभागृहात सदर चौकशी अहवाल फेटाळून लावण्यात आला होता. यामुळे मॅनहोल दुर्घटनाप्रकरणीसुद्धा असा प्रकार घडू नये, यामुळे महापालिका आयुक्त भिडे अलर्ट मोडवर असून अहवाल परिपूर्ण झाल्यानंतर किंवा महापौरांसह सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांचे समाधान होईपर्यत सदर अहवाल सार्वजनिक केला जाणार नसल्याचे महानगरपालिका सूत्रांनी सांगितले आहे.

आयुक्तांची डेडलाईन हुकली

या दुर्घटनेनंतर महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. यात समितीत किशोर गांधी, उपायुक्त (सामान्य प्रशासन), मनिष वळंजू, उपायुक्त (परिमंडळ ७) आणि उपायुक्त (पायाभूत सुविधा) गिरिश निकम आदींचा सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती आणि त्यांना सात दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, प्रशासनाने दिलेली ही मुदत संपून २० दिवस उलटले, तरीही अहवाल समोर आलेला नाही. महानगरपालिका मुख्यालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मॅनहोल दुरूस्तीसाठी नेमलेला कंत्राटदारही फरार आहे, ज्यामुळे जबाबदारी निश्चित करण्याचे प्रयत्न आणखी गुंतागुंतीचे झाले आहेत.

परिणामी पालिका प्रशासनाला अहवाल सार्वजनिक करणे आणि घटनेतील दोषी ठरविणे व दंडात्मक कारवाई करणे अडचणीचे झाले आहे. दुर्घटनेनंतर पालिकेने सहाय्यक आयुक्त यांचे निलंबन केले आहे. मात्र ठोस पुरावा अद्यापही पालिका प्रशासनाच्या हाती न लागल्याने सदर निलंबन रद्द करावे लागणार आहे.

हे झाले निलंबित

साकीनाका मॅनहोलप्रकरणी एल विभागातील सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहाय्यक अभियंता (परिरक्षण) दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजीत चौगुले आणि सहाय्यक अभियंता (मलनिस्सारण प्रचालन) उत्तम पाटील तर चेंबूर दुर्घटनेतील एम पश्चिम विभागातील सहाय्यक उद्यान अधीक्षक जगदीश भोईर, दुय्यम अभियंता (रस्ते) अरूण मुढे, सहाय्यक अभियंता (रस्ते) योगेश पोर्ट यांना निलंबित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT