जोगेश्वरी : अंधेरी एमआयडीसीतील भंगारवाडी शनिवारी वायूगळतीत गुदमरून एकाचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. मात्र ही वायूगळती नेमकी कशामुळे झाली याचे गूढ अद्याप कायम आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी 5 वाजता ही दुर्घटना घडली. एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळील एका तीन मजली इमारतीत अचानक गॅस गळती सुरू झाली. यामुळे अहमद हुसेन (20), नौशाद अन्सारी (28) आणि सना शेख (17) या तिघांना श्वास घेण्यास त्रास होत त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत या तिघांना रुग्णालयात दाखल केले. यातील अहमद हुसेन (20) याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर नौशाद अन्सारी (28) आणि सना शेख (17) या दोघांना अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आल. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
अंधेरीतील गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अग्निशमन दलाचे पथक आणि प्रशासनाचे अधिकारी या गॅस गळतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गॅसगळतीमुळे आणखी कोणी जखमी झाले आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. अनेकदा गॅस गळतीमुळे आग लागण्याचा धोका असतो. मात्र आगीची कोणतीही घटना घडली नसल्यामुळे पुढील अनर्थ टळला.