प्रफुल्ल पटेल यांच्या नावे व्हॉटअपवरुन फसवणुक Pudhari File Photo
मुंबई

'Hello Myself Praful Patel' : चक्क खासदार पटेलांच्या नावे कतारच्या राजकुमाराला गंडवण्याचा प्रयत्न ; जुहू पोलिसांत तक्रार

करण शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने बोगस व्हॉटअप अकाऊंट उघडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सायबर सेल पोलिसांत गुन्हा दाखल होताच राहुल कांत या हॉटेल व्यावसायिकाला सायबर सेल पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. व्यवसायातील आलेले नुकसान भरुन काढण्यासाठी त्याने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. राहुल कांत असे या व्यावसायिकाचे नाव असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. लवकरच त्याच्यावर अटकेची कारवाई केली जाणार आहे.

'Hello Myself Praful Patel' | आयटी सेलमार्फत गुन्हा दाखल

मागील काही दिवसांपासून प्रफुल्ल पटेल यांच्या नावाने एक व्हॉटअप अकाऊंट उघडण्यात आले होते. त्यामध्ये त्यांच्या फोटोचा गैरवापर करुन पैशांची मागणी केली जात होती. त्यासाठी या अज्ञात व्यक्तीने विदेशातील लोकांना टार्गेट केले होते. तीन दिवसांपूर्वी हा प्रकार उघडकीस येताच प्रफुल्ल पटेल यांच्या वतीने विवेक अग्निहोत्री यांनी महाराष्ट्र सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर पोलिसांना गुन्हा दाखल करुन तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशांनतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी राहुल कांत या व्यावसायिकाला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत राहुल हा हॉटेल व्यावसायिक असून तो जुहू परिसरात त्याच्या कुटुंबियाांसोबत राहतो. त्याचा हॉटेलचा व्यवसाय होता, मात्र कोरोना काळात त्याला प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यात त्याच्या आजारी आईच्या औषधोपचारासाठी प्रचंड खर्च येत होता.

'Hello Myself Praful Patel' | कतारमधील नागरिकाची फसवणुक

व्यवसायातील नुकसान भरुन काढणे तसेच आईच्या औषधोपचारासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे झटपट पैशांसाठी त्याने प्रफुल्ल पटेल यांचे बोगस व्हॉटअप अकाऊंटच्या माध्यमातून फसवणुकीचा धंदा सुरु केला होता. या अकाऊंटवरुन त्याने कतारच्या राजकुमाराच्या सल्लागाराकडे पैशांची मागणी करुन त्यांची फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर त्याने ते अकाऊंट बंद केले होते. त्यांची सायबर सेल पोलिसांकडून चौकशी सुरु असून लवकरच त्याच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT