मुंबई

Akhil Bharatiya Rajbhasha Sammelan : "भाषेचं राजकारण करणाऱ्यांना एकच सांगतो..." : अमित शहा मराठीबाबत काय म्हणाले?

देशातील सगळ्या भाषांमध्ये हिंदी भाषा ही माध्यम वाणी बनून सर्वांना संबोधित करेल

पुढारी वृत्तसेवा

Amit Shah Akhil Bharatiya Rajbhasha Sammelan : महाराष्ट्रासारखा बहुभाषिक प्रदेश देशात एकमेव आहे. महाराष्ट्रातील बहुभाषिक संस्कृतीला मी सलाम करतो. मातृभाषा महत्त्वाची आहे. त्याशिवाय आपण प्रगती करूच शकत नाही. भाषा कोणतीही असो भावना भारतीय असली पाहिजे. जे लोक भाषेचे राजकारण करतात त्यांना एकच सांगतो की लहान मुलगा हा आपल्या मातृभाषेमध्येच देशाला पुढे नेऊ शकतो, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषेवरून राजकारणावर व्‍यक्‍त केले. आज (दि. १४ सप्टेंबर) नवी मुंबई येथे आयोजित सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनात ते बोलत होते.

‘मातृभाषेसोबत दुसरी भाषा शिका, भारताचा सच्चा शिपाई बना’

यावेळी अमित शाह म्हणाले की, ‘सर्व हिंदीप्रेमींना माझा प्रणाम. सर्वांना हिंदी दिवसाच्या शुभेच्छा. आज हिंदी दिवस आणि गणेशस्थापनेचा दिवसही आहे. हा मोठा योग आहे. विघ्नहर्ता गणराय भारतीय भाषांच्या विकासाचे मार्ग सुकर करतील,’ असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले. गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्याचे महत्त्वाचे कार्य टिळकांनी केले, असे ते म्हणाले. राजभाषा सन्मान पुरस्कार मिळालेल्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

भारताची बहुभाषिक संस्कृती ही आपली ताकद

‘भारताची बहुभाषिक संस्कृती ही आपली ताकद आहे. अनेक भाषा एकत्र आल्या, त्यांचा मान-सन्मान झाला. या बहुभाषिक संस्कृतीला माझा प्रणाम,’ असे शहा यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी विनोबा भावे यांच्या कार्याचेही स्मरण केले.

‘हिंदीमुळे राष्ट्रीय पातळीवर काम करता आले’

‘मी गुजरातमधून आलो आहे. गुजरातमध्ये गुजराती भाषा बोलली जाते. मात्र, मला हिंदी येत असल्याने राष्ट्रीय पातळीवर दिल्लीत काम करता आले. पक्षाने जबाबदारी दिली, तेव्हा हिंदी समजत असल्याने मला कोणतीही अडचण आली नाही,’ असेही अमित शहा यांनी सांगितले.

‘मातृभाषेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही’

‘मातृभाषा अत्यंत महत्त्वाची आहे. मातृभाषेशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. मातृभाषेसोबत आणखी एक भाषा शिकली, तर भारताचा सच्चा शिपाई बनता येईल,’ असे आवाहन शहा यांनी केले. भारत सरकार मराठीत लिहिलेल्या पत्रांचे स्वागत करते आणि त्यांचा इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद केला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली १३ भाषांमध्ये परीक्षा आयोजित करण्याचे काम करण्यात आले, असे शाह यांनी सांगितले.

२०२९ पर्यंत सर्वात मोठा हिंदी शब्दकोश

२०२९ पर्यंत सर्वात मोठा हिंदी भाषेचा शब्दकोश तयार केला जाईल, अशी माहितीही अमित शहा यांनी दिली. सर्व भारतीय भाषांचा सन्मान राखत हिंदीचा विकास करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

"भाषेचं राजकारण करणाऱ्यांना एकच सांगतो..."

‘काही लोक भाषेचे राजकारण करतात. त्यांना एवढेच सांगतो की, छोटा मुलगा आपल्या मातृभाषेतूनच देशाला पुढे नेऊ शकतो. सर्व भाषांमध्ये हिंदी ही माध्यम वाणी बनून सर्वांना संबोधित करेल,’ असे शहा म्हणाले.

‘भाषा कोणतीही असो, भावना भारतीय असली पाहिजे’

‘भाषा कोणतीही असो, भावना भारतीय असली पाहिजे. भारताची भाषा ही एक असली पाहिजे,’ असे आवाहनही अमित शाह यांनी यावेळी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT