Amit Satam Javed Akhtar Shabana Azmi: मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. क्रॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होत शबाना आझमी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना अमित साटम यांनी जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
अमित साटम यांनी आरोप केला की, जावेद अख्तर खासदार असताना त्यांच्या माध्यमातून इर्ला नाल्याच्या कामासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, हे काम पूर्ण झाले नाही. जनतेचा पैसा खर्च करूनही एकही प्रकल्प पूर्ण करता आला नाही, असा दावा साटम यांनी केला.
याच मुद्द्यावरून साटम यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत पंतप्रधान मोदींना देश कसा चालवायचा, याचे धडे देण्यापूर्वी स्वतःच्या कामाचा हिशेब द्यावा, असा टोला लगावला.
अमित साटम यांनी जावेद अख्तर यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला. जनतेच्या पैशातून करण्यात येणारे प्रकल्प पूर्ण झाले नाहीत, मात्र खंडाळ्यातील ‘सुकून’ नावाचा बंगला मात्र पूर्ण बांधून झाला, अशा शब्दांत साटम यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका केली.
दरम्यान, शबाना आझमी यांनी क्रॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर अमित साटम यांनी त्यांच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केले.
साटम यांच्या या टीकेमुळे जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्याविरोधातील भाजपची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. त्यांच्या आरोपांवर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.