Amey Khopkar On Kapil Sharma Show :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी द कपिल शर्मा शोला विनंती वजा इशारा दिलाय. त्यांनी द कपिल शर्मा शो मध्ये येणारे गेस्ट आणि अँकर हे मुंबईचा उल्लेख अजूनही मुंबई असा करत आहेत. यावर अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पोस्ट करून याबाबत द कपिल शर्मा शो अर्थात कॉमेडियन कपिल शर्माला इशारा दिलाय.
अमेय खोपकर आपल्या पोस्टमध्ये लिहितात, 'बॉम्बेचे मुंबई असे अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली आहेत. तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे.'
९ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर कपिल शर्मा शोचा एक एपिसोड प्रदर्शित झाला होता. या एपिसोडमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशी आली होती. तिच्या सोबत अभिनेता साकिब सलीम देखील होता. यावेळी कपिल शर्मासोबत हास्यविनोद करताना हुमा कुरेशी ही मुंबईऐवजी बॉम्बे असा उल्लेख करते. ती म्हणते, 'हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. मी याच्यासोबत काहीही शेअर करू शकते. सर्वात म्हत्वाची गोष्ट म्हणजे हा मला जज करत नाही. हे खूप महत्वाचं आहे कारण आम्ही बाहेरून आलो आहे. आम्ही बॉम्बेचे नाही.'
या वाक्यावरच अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला आहे. अमेय खोपकर यांनी या शोमध्ये येणारे अनेक अभिनेते, खुद्द अँकर आणि राज्यसभेतील खासदार हे मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करतात असं म्हणत हे खपवून घेणार नाही असा इशाराच शो च्या निर्मात्यांना अन् अप्रत्यक्षरित्या कपिल शर्माला दिला आहे.