

नवी दिल्ली : दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या निधनानंतर, त्यांच्या तब्बल 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून उफाळलेला वाद कथित बनावट मृत्युपत्रामुळे आता अधिकच गहिरा बनला आहे. आपल्याला या संपत्तीतील योग्य वाटा मिळावा, अशी मागणी संजय कपूर यांची द्वितीय पत्नी करिष्मा कपूर यांच्या समाईरा आणि कियान या दोन मुलांनी दिल्ली उच्च न्यायालयात लेखी स्वरूपात केली आहे.
आमची सावत्र आई प्रिया सचदेव यांनी संजय यांचे बनावट मृत्युपत्र तयार करून त्यातून आपल्याला वगळल्याचा दावा या दोन्ही मुलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला आहे. त्यामुळे न्यायालय कोणाच्या बाजूने निकाल देणार, याबद्दल उत्सुकता वाढली आहे. या प्रकरणात, संजय कपूर यांच्या तिसर्या पत्नी प्रिया सचदेव-कपूर यांनी 21 मार्च रोजी एक मृत्युपत्र तयार केले होते. त्यात, संजय यांनी सर्व संपत्ती प्रिया यांच्या नावे केल्याचा उल्लेख आहे. तथापि, करिष्मा यांच्या मुलांनी ते मृत्युपत्रच बनावट असल्याचा आरोप केला आहे. प्रिया यांनी हे मृत्युपत्र लपवून ठेवले आणि संजय यांच्या मातोश्री राणी कपूर यांना त्यावर सही करण्यास भाग पाडले, असा दावा करिष्मा यांच्या दोन्ही मुलांनी केला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने करिष्मा कपूर यांच्या दोन्ही मुलांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत प्रिया सचदेव-कपूर यांना संजय कपूर यांच्या संपत्तीचा साद्यंत तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विशेष म्हणजे, करिष्मा यांनी या प्रकरणात स्वतः हस्तक्षेप केलेला नाही. प्रिया सचदेव-कपूर यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे की, करिष्मा आणि तिच्या मुलांना आधीच 1,900 कोटी रुपयांच्या संपत्तीचे वाटप करण्यात आले आहे.
यंदाच्या 12 जून रोजी इंग्लंडमध्ये एका पोलो सामन्यादरम्यान संजय कपूर यांचे निधन झाले होते. संजय यांचे लग्न नंदिता महतानी यांच्यासोबत झाले. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2001 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा कपूरसोबत 2003 साली लग्नगाठ बांधली. तथापि, 2016 साली हे नातेही तुटले. संजय आणि करिष्मा या दाम्पत्याला दोन मुले झाली. करिष्माशी काडीमोड झाल्यानंतर संजय यांनी दिल्लीत मॉडेलिंग करणार्या प्रिया सचदेव यांच्याशी विवाह केला.