Spectacular wedding ceremony at Ambani's house today
आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत मुकेश अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा होत आहे.  Anant Ambani-Radhika Merchant
मुंबई

Ambani Wedding : आज अंबानी यांच्या घरी नेत्रदीपक विवाह सोहळा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई | Ambani Wedding : आज वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत मुकेश अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा होत असून, गेले पाच महिने सुरू असलेल्या विवाहपूर्व सोहळ्यांच्या भव्यतेने आणि लखलखाटाने उभ्या दुनियेतील श्रीमंती-अतिश्रीमंतीचेही डोळे दीपून गेले आहेत.

निमंत्रितांच्या आणि यजमानांनी परिधान केलेल्या नवरत्नांचा लखलखाट आणि या नवरत्नांच्याही किमतीशी स्पर्धा करणारे पेहराव आणि त्यावरही जडवलेली हिरे-माणके या या सोहळ्यांचे खास वैशिष्ट्य होय. विवाहपूर्व सोहळे आणि 12 जुलै रोजी होणारा मुख्य विवाह सोहळा मिळून किती खर्च झाला याचा हिशेब अंदाजाने बांधूनही मांडता आलेला नाही. डेली मेल या पाश्चात्त्य वृत्तपत्राने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अंबानी समूहाने या विवाह सोहळ्यावर 350 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 2500 कोटींपेक्षाही अधिक खर्च केला असू शकतो.

12 जुलैच्या मुख्य विवाह सोहळ्याला अडीचशे पाहुणे खास निमंत्रित आहेत. त्यांच्या जाण्या-येण्यासाठी अंबानी कुटुंबाने 3 फाल्कन-2000 जेट भाड्याने घेतले असून, याशिवाय 100 हून अधिक खासगी विमानेही बूक करण्यात आल्याचा अंदाज आहे.

अंबानी घरच्या या सोहळ्याला शुक्रवारी देश-विदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, उद्योगपती, बडे व्यापारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रूपेरी दुनियेतील चित्रतारे एकच गर्दी करणार आहेत. एका अंदाजानुसार, विमानांची प्रचंड वर्दळ असणार्‍या मुंबईत या विवाह सोहळ्यासाठी शंभर खासगी विमाने उतरणार असून, तीन फाल्कन जेट देखील दाखल होणार आहेत. नामवंत पाहुण्यांची यादी साधारण 2,500 जणांची आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनकड गुरुवारीच मुंबईत विधिमंडळाच्या कार्यक्रमानिमित्त आले. ते आता अंबानींच्या नवदाम्पत्यावर अक्षता टाकूनच दिल्लीला परततील. देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार असून, त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आदीही मुंबईत डेरेदाखल होत आहेत.

गेल्या 1 मार्चला अनंत-राधिकाच्या विवाहपूर्व सोहळ्यांना सुरुवात झाली आणि प्रत्येक सोहळा जगभर चर्चेचा विषय ठरला. गुजरातच्या जामनगरला म्हणजे अंबानी घराण्याच्या मूळ शहरापासून या कार्यक्रमांना सुरुवात झाली. या पहिल्याच कार्यक्रमाला फेसबुकवाले मार्क झुकेरबर्ग, मायक्रोसॉफ्टचे बिल गेटस्, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची ज्येष्ठ कन्या इव्हांका यांच्यासह जागतिक कीर्तीचे 1200 पाहुणे उपस्थित होते. या कार्यक्रमात गाण्या-नाचण्याचे पॉप सिंगर रिहानाने 72 कोटी रुपये बिदागी घेतल्याचे म्हटले जाते.

बीकेसीत वाहतूक बदल

  • 12 जुलै रोजी मुख्य विवाह सोहळा आणि त्यानंतर 15 जुलैपर्यंत स्वागत सोहळ्यासह अन्य कार्यक्रम असल्याने बीकेसीतील अनेक वाहतूक मार्गांत बदल करण्यात आले असून, काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली आहे.

  • लक्ष्मी टॉवर जंक्शन येथे धिरूभाई अंबानी स्क्वेअर अव्हेन्यू मार्गिका 3 मार्गे इंडियन ऑईल पेट्रोल पंप, डायमंड जंक्शन, हॉटेल ट्रायडंट आणि एमटीएनएल दिशेने कार्यक्रमाच्या वाहनांशिवाय अन्य वाहनांना प्रवेशबंदी असेल.

  • वन बीकेसीकडून येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे.

  • भारतनगर, वन बीकेसी, वुईर वर्क, गोदरेज, बीकेसीवरून सर्व वाहनांना जिओ कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक 23 येथून अमेरिकन दूतावास, एमटीएनएल जंक्शनच्या दिशेने जाण्यास बंदी राहील.

  • लतिका रोड हा अंबानी स्क्वेअर तेे लक्ष्मी टॉवर जंक्शनपर्यंत एक दिशा करण्यात आला आहे.

  • अव्हेन्यू रोड हा कौटील्य भवन ते अमेरिकन दूतावास जंक्शनपर्यंत एकदिशा करण्यात आला आहे.

SCROLL FOR NEXT