हस्तीनापूरचा सम्राट प्रतीप पुरूचा वंशज होता. इंद्राने दिलेल्या शापामुळे महाभिषाचा जन्म प्रतीप राजाच्या पोटी झाला. त्याचेच नाव शंतनू. कालांतराने हस्तीनापूरच्या राज्यकारभाराची सूत्रे शंतनूकडे आली. वृद्ध प्रतीप एके दिवशी नदीकिनारी तपश्चर्या करत असताना तेथे गंगा अवरतली. गंगेने शंतनूशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली, ती प्रतीपने मान्य केली. प्रतीपने शंतनूला आदेश दिला, लवकरच गंगा नावाची एक सौंदर्यवती तुला भेटेल, तिला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तू तिची इच्छापूर्ण कर.
काही दिवसांनी शंतनूला माशाच्या पाठीवर जलविवार करणारी गंगा दिसली, तो त्याच क्षणी तिच्या प्रेमात पडला. शंतनूने तिला लग्नाची गळ घातली. गंगाने शंतनूची लग्नाची मागणी मान्य केली, पण तिची एकच अट होती, ती म्हणजे शंतूनने तिला कोणत्याही कृतीची कारणमीमांसा विचारायची नाही. शंतनूने ही अट मान्य केली.
पुढे शंतनू आणि गंगेला पहिला मुलगा झाला. मात्र हे मूल जन्मताच गंगेने वाहत्या नदीपात्रात सोडून दिले. शंतनूला गंगेच्या या कृतीचा प्रचंड संताप आला, पण तो काहीच बोलू शकला नाही, कारण त्याने तसे वचनच गंगेला दिले होते. शंतनू आणि गंगेला पुढे सात पुत्र झाले आणि हे सातही पूत्र गंगेने वाहत्या पाण्यात सोडून दिले.
शंतून आणि गंगा यांना आठवा पुत्र झाला. गंगा याही पुत्राला नदीत सोडण्यासाठी निघाली होती, तेव्हा मात्र शंतनू स्वतःला रोखू शकला नाही. "थांबव तुझे हे कौर्य. या मुलाला जगू दे," शंतनू संतापला होता. यावर गंगेने शंतनूने दिलेल्या वचनाची आठवण करून दिली आणि तुम्हाला सोडून जात असल्याचे सांगितले.
"ज्यांची मी हत्या केली ते सात देव होते. त्यांना वसू या नावाने ओळखले जाते. वसूने वसिष्ठांची कामधेून चोरली होती, त्यामुळे त्यांना मानवाचा जन्म घ्यावा लागेल, असा शाप देण्यात आला होता. यावर वसूंनी मला त्यांची आई व्हावे असे विनवले होते. पण मनुष्य जन्मानंतर त्यांच्या मृत्युलोकातील कालावधी कमी व्हावा यासाठी मी त्यांना मारून टाकत होते. मात्र अष्टवसूंपैकी शेवटच्या वसूला मी या यातना चक्रातून मुक्त करू शकले नाही," असे गंगा म्हणाली.
वाचलेले हे मूल कधीही विवाह करू शकणार नाही, तो कधीही सिंहासनाचा वारस होणार नाही, त्याचा मृत्यू अशा पुरुषाकडून होईल जो प्रत्यक्षात स्त्री असेल, असेही गंगेने सांगितले.
गंगा या मुलाला घेऊन निघून गेली. या मुलाचे तिने उत्तम पालन केले आणि हा मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला शंतनूकडे परत पाठवले. या मुलाचे नाव म्हणजे देवव्रत.
पण शंतनू पुन्हा एकदा प्रेमात पडला. सत्यवती या कोळीणीशी शंतनूला विवाह करायचा होता. पण सत्यवतीने एक अट घातली की आपल्या पोटी येणारा मुलगा हाच हस्तिनापूरचा सम्राट बनला पाहिजे. पण देवव्रत आधीच युवराज असल्याने शंतनूला हे शक्य नव्हते. देवव्रताला जेव्हा हे समजले तेव्हा तो सत्यवतीला भेटायला गेला आणि सिंहासनावरील अधिकार सोडत असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात तुझी मुले आणि माझी मुले यांच्यात संघर्ष होऊ नये यासाठी देवव्रताने कधीही लग्न न करण्याचे आणि स्त्रीसहवासदेखील वर्ज्य करण्याची प्रतिज्ञा केली.
देवव्रताच्या या प्रतीज्ञेमुळे देव स्वतः पृथ्वीवर आले आणि देवव्रताचे नाव भीष्म असे ठेवले आणि त्याला वर दिला की तू तुझ्या इच्छेनुसार स्वतःच्या मृत्यूची वेळ निवडू शकशील, तू इच्छमरणी होशील.
संदर्भ - जय, महाभारत सचित्र रसास्वाद | लेखक - देवदत्त पट्टनायक | भाषांतर - अभय सदावर्ते | पॉप्युलर प्रकाशन