मुंबई : 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरल्याने गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 12) मतदान होत आहे. 12 व्या उमेदवाराने आपला दावा कायम ठेवल्याने भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात कोण कोणाला मते देणार, याबाबत संशय निर्माण झाला आहे. काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आमचे तीन ते चार आमदार फुटणार, अशी वावडी उडवल्याने हा संशयकल्लोळ आणखी गडद झाला आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार यापेक्षा पडणार कोण? याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि शेकाप यांच्या उमेदवारांपैकी एक उमेदवार पडेल, अशी चर्चा झडत आहे. भाजपचे परिणय फुके, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे शिवाजीराव गर्जे किंवा शेकापचे जयंत पाटील यांच्यापैकी एकाच्या पराभवाची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षांची धाकधूक वाढली आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची मते या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत. लक्ष्मीदर्शन आणि ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी होऊनही पक्षाचे असो की, अपक्ष वा छोट्या पक्षांचे आमदार अखेरच्या क्षणी कुणाला मतदान करतील, याबाबत कुणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. अकरा जागांसाठी महायुतीत भाजप 5, शिवसेना शिंदे गट 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2 असे 9 उमेदवार रिंगणात आहेत; तर महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना आणि शेकाप यांनी प्रत्येकी एक असे एकूण तीन उमेदवार उभे केले आहेत.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 4 मोठ्या पक्षांनी आपापल्या पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. आमदार फुटू नयेत आणि कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या 4 पक्षांनी आपापले आमदार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्या आमदारांसाठी हॉटेलमध्ये रात्री भोजन ठेवले आहे.
माजी आमदार व माजी राज्यमंत्री परिणय फुके हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटचे मानले जातात. भाजपकडे पाचही उमेदवार निवडून आणण्याइतपत संख्याबळ आहे. मात्र, भाजपमधील फडणवीसविरोधी गटातर्फे त्यांच्या जवळच्या फुके यांना पाडून त्यांची नाचक्की करण्यात अधिक रस आहे. त्यामुळे नवी दिल्लीतील भाजपचे काही नेते फुके यांना पाडण्यासाठी सक्रिय झाले असून, तशा सूचना काही भाजप आमदारांना देण्यात आल्या असल्याची सध्या चर्चा आहे. अर्थात, हे टाळण्यासाठी फडणवीस यांनी आपले रणनीती कौशल्य व मतांचे गणित पणाला लावले आहे. बहुजन विकास आघाडीची 3 मतेही भाजपकडे वळविण्यात फडणवीस यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव मिळविण्यात आणि आमदारांना सोबत घेऊन जाण्यात पक्षाचे तत्कालीन कार्यालय प्रमुख शिवाजीराव गर्जे यांची मोलाची मदत झाली. त्यावेळी गर्जे यांना उमेदवारी देण्याचा शब्द अजित पवारांनी दिला होता. आज होणार्या मतदानात गर्जे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर पक्षाने ठेवल्याची माहिती आहे. मात्र, राजेश विटेकर यांनी परभणीत पक्षाला दिलेली साथ पाहता त्यांना दगाफटका होण्याची शक्यता नाही. गर्जे प्रशासकीय सेवेतून राजकीय पक्षाच्या प्रशासनापर्यंत प्रवास केलेले नेते आहेत. त्यामुळे आमदार त्यांना मतदान करतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे अनेक आमदार अस्वस्थ असून, पुन्हा शरद पवारांच्या गटात परतण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे हे आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेल्या जयंत पाटील यांना मतदान करू शकतात.
समाजवादी पक्षाचे 2, तर एमआयएमचे 2 आमदार असून, हे 4 आमदार अजित पवारांच्या उमेदवारांना मतदान करतील, असे सांगितले जात आहे. त्यांना आपल्या बाजूने वळविण्यात अजित पवार यशस्वी झाले, असे कळते.
अखेरच्या क्षणी मिलिंद नार्वेकर यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी अर्ज भरून बिनविरोध होईल, असे वाटणार्या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. स्वबळावर विजयासाठी पुरेसे संख्याबळ नसतानाही नार्वेकरांना काँग्रेसची मिळणारी अतिरिक्त मते आणि महायुतीतील काही आमदारांची मते मिळविण्यात नार्वेकर यशस्वी झाल्याची चर्चा असून, त्यामुळे त्यांच्या विजयाची खात्री सर्वांना वाटत आहे.
महायुती : 196
भाजप - 103+7 एकूण : 110
5 अपक्ष (रवी राणा, प्रकाश आवाडे, विनोद अग्रवाल, महेश बालदी, राजेंद्र राऊत)
रत्नाकर गुट्टे (रासप) आणि विनय कोरे (जनसुराज्य)
शिंदे गट - 38+6 अपक्ष : 44
6 अपक्ष (आशिष जैस्वाल, मंजुळा गावित, राजेंद्र यड्रावकर, गीता जैन, नरेंद्र भोंडेकर आणि किशोर जोरगेवार)
अजित पवार गट - 40+2 अपक्ष : 42
2 अपक्ष (संजय शिंदे, चंद्रकांत पाटील)
महाविकास आघाडी : 65
काँग्रेस - 37 ठाकरे गट - 15+1 एकूण : 16 शरद पवार गट - 12