Ambadas Danve
अंबादास दानवे यांचे निलंबन मागे घेण्यात आलेे.  File Photo
मुंबई

Ambadas Danve : अंबादास दानवेंचे निलंबन मागे

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधान परिषदेत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना अपशब्द वापरल्यामुळे निलंबित झालेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आलेे. निलंबनाचा कालावधी दोन दिवसांनी कमी केल्यामुळे दानवे यांचा उद्या, शुक्रवारपासून सभागृहात उपस्थित राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. निलंबन काळात त्यांना विधान भवनाच्या परिसरात येण्यासही बंदी घातली होती. मात्र, विरोधी पक्षनेत्याशिवाय सभागृहात आम्हाला काम करणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी भूमिका विरोधी पक्षाच्या आमदारांनी घेतली होती.

दरम्यान, निलंबन मागे घेण्यासाठी दानवेंनी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांना पत्रही दिले होते. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच गटनेत्यांची बैठकही झाली. या बैठकीत निलंबनाचा कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात बुधवारी सभागृहात ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी सरकारने भूमिका जाहीर करण्याची मागणीही केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील गुरुवारी निर्णय जाहीर करतील, असे सांगितले होते. त्यानुसार निलंबनाच्या कारवाईसंदर्भात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत प्रस्ताव मांडला. दानवे यांच्या निलंबन कालावधीत कपात करावी, अशी मागणी त्यांनी केली. उपसभापती गोर्‍हे यांनी हा प्रस्ताव सभागृहासमोर ठेवल्यानंतर सर्वांनी एकमताने मंजूर करून निलंबनाचा कालावधी पाच दिवसांऐवजी तीन दिवसांचा केला.

टी-20 मॅच खेळणार : दानवे

निलंबन मागे घेतल्याबाबत दानवे यांनी सभापतींचे आभार मानले. मात्र, त्यांनी फार काही न्याय दिला असा भाग नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. सभागृहातील कामकाजाचे तीन दिवस तर संपलेले आहेत. उद्याचा एक दिवस आहे. परवा कामकाज नाही. त्यामुळे पाच दिवसांपैकी मला फक्त एक दिवस मिळणार आहे, असा त्याचा अर्थ आहे. मात्र, या एका दिवसात जसा टेस्ट मॅच खेळतो तसा टी-20 मॅचही खेळू शकतो, असा इशारा दानवे यांनी दिला.

SCROLL FOR NEXT