हापूसची एपीएमसीची यंदाची गुढी केवळ 10 हजार पेट्यांची  pudhari photo
मुंबई

Alphonso mango production : हापूसची एपीएमसीची यंदाची गुढी केवळ 10 हजार पेट्यांची

गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 हजार पेट्यांनी आवक घटली

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई: यावर्षी विचित्र हवामानामुळे हापूस आंब्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून केवळ 20 टक्केच पिक बागायतदारांच्या हाती लागले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई एपीएमसीमध्ये उद्या गुरुवारी गुढीपाडव्याला हापूसची केवळ 10 हजार पेट्यांची आवक होईल, अशी माहिती देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक तब्बल 40 हजार पेट्यांनी घटली आहे. कमी उत्पादनामुळे हापूसचे दर 5 ते 9 डझनाच्या पेटीचे 2 ते 9 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

15 दिवसात हापूसच्या केवळ 26 हजार 273 पेट्यांची तर परराज्यातील हापूसच्या 1 लाख 7 हजार 712 क्रेटची आवक झाली. पहिल्यांदाच परराज्यातील हापूसने कोकणच्या हापूसवर मात केल्याचे चित्र आहे.

एप्रिल महिन्यात आवक वाढल्यास कोकण हापूसचे पाच ते आठ डझनाच्या पेटीचे दर 2000 ते 3500 रुपये असतील. कोकण हापूस जानेवारीपासूनच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ लागल्याने हापूसची पाडव्याच्या मुहूर्ताची क्रेझ आता संपली आहे. अशी माहिती घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

आधी हापुस विक्रीसाठी पाडव्याचा मुहूर्ता निघायचा. शेतकरीही याच मुहूर्ताला कोकण हापूस विक्रीसाठी बाजारात पाठवायचे. मात्र आता जानेवारीपासूनच कोकण हापूस मुंबई एपीएमसी येऊ लागला. आता साधारणता: 20 एप्रिलपर्यंत देवगड, राजापूर हापूसची आवक होईल. त्यानंतर 15 एप्रिलपासून रत्नागिरीतील आंबा विक्रीसाठी बाजारात येईल. 20 एप्रिलपासून श्रीवर्धन, बागमांडला, मुरुड, अलिबाग, दापोली, बाणकोटच्या आंब्यांची आवक सुरु होईल.

मुंबईतील कोकण हापूसचा व्यवसाय करणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांनी मुंबई एपीएमसीतुन एक आठवडा आधीच कच्चा कोकण हापूससह परराज्यातील आंबा खरेदी केला आहे. कोकण आणि परराज्यातील हापूसची 4 ते 18 मार्च या 15 दिवसाच्या कालावधीत 1 लाख 30 हजार पेट्यांची एपीएमसीत विक्री झाली. हा कच्चा कोकण हापूस 2000 ते 2500 रुपये डझन दराने दुय्यम दर्जाच्या ( डागी माल) किरकोळ व्यापाऱ्यांनी खरेदी केला. तोच हापूस फिकवून गुढीपाडव्याला तीन ते साडेतीन हजार रुपये डझन दराने मुंबईसह उपनगरात विकत आहेत.

4 मार्चपासून विक्री झालेला कच्चा हापूस चार ते पाच दिवसात पिकवून मुंबईत गुढीपाडव्याला आणि आदल्या दोन दिवस आधी विक्रीसाठी बाजारात उपलब्ध झाला आहे. कच्चा हापूसपेक्षा 30 टक्के आधिक दर पिकवलेल्या हापूसच्या पेटीचे असतात. तर एपीएमसीतील व्यापाऱ्यांकडे तयार हापूस नसल्याने अनेक ग्राहकांना परत जावे लागले.

घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यात मराठी टक्का घसरला

कोकण हापूसचा व्यापार करणारे मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत किमान 8 ते 10 हजार किरकोळ व्यापारी आहेत. त्यामध्ये 15 ते 20 टक्के व्यापारी मराठी असून उर्वरित 80 टक्के व्यापारी बंगाली, युपीचे आहेत. कोकण हापूसच्या काळात तीन महिन्यासाठी गाळे भाड्याने घेऊन हापूसचा व्यवसाय करतात. तर एपीएमसीमध्ये ही घाऊक व्यापाऱ्यांमध्ये 25 ते 30 टक्के मराठी व्यापारी शिल्लक आहेत. काही व्यापारी कर्जबाजारी झाल्याने त्यांनी गाळे भाड्याने दिले. यामुळे हा व्यवसाय अमराठी व्यापाऱ्यांच्या हातात गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT