मुंबई : पुण्यातील जमीन खरेदीप्रकरणी अडचणीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार तथा विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. अजित पवार यांच्या या टोकाच्या भूमिकेमुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार पिता-पुत्रांना वाचवत आहेत, असे ते म्हणालेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या पुण्यातील कथित भूखंड घोटाळ्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
दानवे म्हणाले की, शरद पवारांनी या प्रकरणी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. पार्थ पवारांना कसे वाचवले? हे फडणीसांनाच विचारा असे ते म्हणालेत. यासंबंधी वर्षावर (मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान) मोठ्या घडामोडी घडल्या. माझ्या माहितीनुसार, त्या दिवशी वर्षावर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी त्वेषाने बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देतो अशी भूमिका घेतली होती. ते पुढे म्हणाले, पुण्यातील भूखंड घोटाळा हा भाजपनेच बाहेर काढला. आता त्यांच्याकडूनच अजित पवार व पार्थ पवारांना वाचवले जात आहे. अंबादास दानवे यांनी ज्या बैठकीचा संदर्भ देवून अजित पवार सत्तेबाहेर पडणार असल्याचे विधान केले आहे, त्या बैठकीला आपण स्वत: हजर होतो, तेथे असा प्रकार घडलेला नाही, दानवे हे खोटे बोलत आहेत, असा खुलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.