मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर आरोप आणि शंका घेतल्या जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी आमच्या पक्षाचे बडे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आणलेल्या कामाला उशीर झाल्यामुळे अजित पवार यांना कारऐवजी विमानाने जावे लागले आणि त्याच विमानाला अपघात झाला, अशी धक्कादायक माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारी रोजी कल्याण येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय शोकसभेत प्रमोद हिंदुराव यांनी केलेल्या भाषणाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओतून ही माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांचे बाय रोड जाण्याचे ठरले होते. सर्व बॅगा गाडीत टाकल्या. परंतु त्याचवेळी प्रफुल्ल पटेल की आणखी कोणाचा तरी दादांना फोन आला. मंत्रालयात एक फाईल अडकली असून त्याच्यावर सही हवी आहे. म्हणून अजित पवार यांनी सचिवाला फोन केला, ती फाईल लवकर घेऊन ये, पुन्हा मी आठवडाभर नाही, असे त्यांनी सचिवाला सांगितले. परंतु फाईल आणायला साडेसात-आठ वाजले. मग उशीर झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितले की, मी विमानाने जातो. गाडीतल्या बॅगा त्यांनी परत काढल्या आणि ती अघटित घटना घडली.
शरद पवार गटाच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत नुकत्याच आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विमान अपघाताची तांत्रिक आणि इतर माहिती दिली होती. यासोबतच कोणाचेही नाव न घेता रोहित यांनी पूर्व विदर्भातील एका नेत्याने आणलेल्या फाईलचे काम करण्यास उशीर झाल्यामुळे अजित पवार यांना विमानाने जावे लागले, असे सांगितले होते. परंतु, हिंदुराव यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओतून थेट प्रफुल्ल पटेल यांचे नाव प्रथमच समोर आले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह इतर राजकीय पक्षांमध्येही खळबळ उडाली आहे.