Ajit Pawar Controversy Canva Image
मुंबई

Ajit Pawar Controversy : महिला अधिकाऱ्याबद्दल मला.... अजित पवारांचे त्या वादग्रस्त व्हिडिओवर आलं स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. प्रशासनावर दबाव आणत आहेत असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला.

Anirudha Sankpal

Ajit Pawar Controversy :

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वादग्रस्त व्हिडिओवरून सध्या राजकीय रणकंदन सुरू आहे. सोलापूरमधील माढा इथल्या सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर कारवाई करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांना ओरडतानाचा अजित पवार यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यावरून देशभरातून प्रतिक्रिया येऊ लागल्या. याबाबत आता अजित पवार यांनी ट्वीट करून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

माढा येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. घटनास्थळी कारवाई करत असताना राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने अजित पवार यांना फोन करून तो आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना जोडून दिला. याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. अजित पवार आयपीएस अधिकाऱ्यांना ही कारवाई थांबवण्याचा आदेश देत होते. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. प्रशासनावर दबाव आणत आहेत असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला.

यानंतर आता अजित पवार यांनी ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.'

अजित पवार पुढे म्हणाले, 'आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.'

अजित पवार यांच्या या स्पष्टीकरणाने सर्वांचे समाधान होईल की नाही हे येत्या काळात पुढे येईलच. मात्र या व्हायरल व्हिडिओमुळे स्पष्टवक्ते असलेल्या अजित पवार यांच्या प्रतिमेला तडा गेल्याची चर्चा नक्की सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT