India Future Weapons :
ऑपरेशन सिंदूरनंतर भविष्यातील युद्धे ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लढली जातील हे स्पष्ट झालं. ज्याच्याकडे आधुनिक शस्त्रांचा साठा जास्त त्याची बाजू युद्धात वरचढ ठरण्याची शक्यता अधिक! भारतीय लष्करानं देखील आधुनिकतेची कास धरली आहे. नुकतेच आपला शेजारी देश चीनने आपल्या व्हिक्टरी परेडमध्ये आपल्या आधुनिक शस्त्रसाठ्यांचं प्रदर्शन केलं. त्यानंतर भारताचा काय प्लॅन आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. भारतीय लष्कर देखील आधुनिक शस्त्रांमध्ये वाढ करत आहे. भारतीय लष्करानं आपल्या आधुनिकीकरणाचा पुढच्या १५ वर्षाची ब्लूप्रिंट ठेवली.
भारतीय लष्कराच्या ताफ्यात आता न्युक्लिअर पॉवर्ड वॉरशीप येणार आहेत. त्याच जोडीला लेसर वेपन, एआय तंत्रज्ञानावर आधारीत हत्यारं देखील समाविष्ट होणार आहेत. भारतीय एअर फोर्स ७५ हाय अल्टिट्यूड स्युडो सॅटेलाईट, १५० स्टेल्थ बॉम्बर ड्रोन, शेकडो प्रिसिजन गायडेड मिनिशन आणि १०० रिमोट पायलेटेड विमानं खरेदी करणार आहे.
याचबरोबर भारतीय लष्कर एआय तंत्रज्ञानावर आधारित शस्त्रांची देखील खरेदी करणार आहे. याचबरोबर स्वयंमचलीत हत्यारे, स्पेस वॉरफेअर खरेदी करण्यावर देखील भर राहणार आहे. भारतीय लष्कर २१ व्या शतकातील बदलत्या आव्हाने आणि धोके लक्षात घेऊन आधुनिक शस्त्रास्त्र खरेदी करत आहे.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले चढवले होते. त्यानंतर पाकिस्ताननं भारतावर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताच्या तगड्या एअर डिफेन्ससमोर हा ड्रोन हल्ला निष्प्रभ ठरला. पाकिस्ताननं यावेळी भारतीय नागरी वस्त्यांना टार्गेट केलं होतं. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या महत्वाच्या लष्करी तळांवर आणि हवाई अड्ड्यांवर हल्ला करत त्यांचं मोठं नुकसान केलं होतं.
यानंतर पाकिस्ताननं नांगी टाकली अन् सीज फायरसाठी विनवणी सुरू केली होती. मात्र या सर्व घटनाक्रमामध्ये आधुनिक वॉरफेअरचं महत्व अधोरेखीत झालं. याच आधुनिक वॉरफेअरमध्ये आघाडीवर राहण्यासाठी भारतीय आर्म फोर्सेसनी आता कंबर कसली आहे.
याचबरोबर भारतीय लष्कराचा कल हा शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकडे आहे. डीआरडीओ पाचव्या जनरेशनची स्टेल्थ विमानं, अन् जेट इंजिन हे भारतातच तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.