मुंबई ः पदवी हा केवळ शैक्षणिक टप्पा नसून समाज आणि राष्ट्रासाठी जबाबदारी स्वीकारण्याची सुरुवात आहे. कुतूहल-केंद्रित अध्यापन, संकल्पनात्मक स्पष्टता आणि प्रत्यक्ष प्रयोगांवर आधारित शिक्षण ही भविष्यातील यशाची गुरुकिल्ली असल्याचे मत भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
फोर्ट येथील सर कावसजी जहाँगीर दीक्षान्त सभागृहात पार पडलेल्या या समारंभात विविध विद्याशाखांतील एकूण 1 लाख 72 हजार 522 स्नातकांना पदव्या, 602 विद्यार्थ्यांना पी.एचडी., तर 19 विद्यार्थ्यांना 21 पदके प्रदान करण्यात आली.
या समारंभाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण2020चे महत्त्व विशद करत हे धोरण सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचा मजबूत पाया असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे आणि संचालक परीक्षा व मूल्यपामन मंडळ डॉ. पूजा रौंदळे यांच्यासह अधिसभा, व्यवस्थापन परिषद, विद्यापरिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता यांच्यासोबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विभागप्रमुख, प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
पदव्यांचा तपशील
एकूण स्नातक- 1,72,522
मुले - 84,318
मुली - 88,202
इतर - 02
पदवी अभ्यासक्रम - 1,49,982
पदव्युत्तर अभ्यासक्रम - 22,540
वाणिज्य व व्यवस्थापन - 86,280
विज्ञान व तंत्रज्ञान - 54,729
मानव विज्ञान - 24,076
आंतरअभ्यासशाखीय - 7,437
पीएचडी पदव्यांचा तपशील
विद्याशाखा - पीएचडी पदव्या
विज्ञान व तंत्रज्ञान - 269
वाणिज्य व व्यवस्थापन - 145
मानव विज्ञान - 109
आंतर-विद्याशाखीय - 79
एकूण- 602
‘इंडिया स्किल्स रिपोर्ट’चा उल्लेख करत भारत कौशल्य-प्रथम अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत असल्याचे डॉ. सूद यांनी स्पष्ट केले. रोजगारक्षमता वाढ, महिलांचा वाढता सहभाग व कृत्रिम बुद्धिमत्तेतील प्रगती भारतासाठी आशादायी असल्याचे त्यांनी सांगितले.