नवी मुंबई : ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाने सध्या वेग पकडला आहे.  pudhari photo
मुंबई

Navi Mumbai Elevated Corridor Project : ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला वेग

२०२७ अखेरपर्यंत मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; पिलर आणि गर्डर उभारणीचे काम सुरू

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाने आता वेग पकडला आहे. या प्रकल्पातील विविध अडथळे दूर झाल्याने प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळाली असून सध्या पिलर उभारणीसह गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. सन २०२७ अखेरपर्यंत हा उन्नत मार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाच्या पूर्ततेच्या आशा वाढल्या आहेत.

नवी मुंबई शहराची उभारणी करताना सिडकोने बेलापूर ते ऐरोली असा २१.१५ किमीचा पामबीच मार्ग नियोजित केला होता. त्यानुसार घणसोलीपर्यंत सुमारे १९.२० किमी लांबीचा रस्ता २००९ पर्यंत पूर्ण करण्यात आला. मात्र, घणसोलीच्या पुढील भागात कांदळवन असल्याने पर्यावरणविषयक परवानग्या आणि विविध प्रशासकीय मंजुरींच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे उर्वरित भागात वाहतुकीसाठी उन्नत मार्ग उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला.

सुरुवातीला सुमारे १.९४ किमीचा पूल उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यासाठी सुमारे ८०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याने हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. त्यानंतर २०१७ मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने नव्याने सुमारे ३.२ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित केला. हा मार्ग ऐरोली-कटाई उन्नत मार्गाशी जोडण्याचे नियोजन करण्यात आले.

या प्रकल्पासाठी सुरुवातीला सुमारे ३७२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र, कांदळवन, पर्यावरण विभागाच्या परवानग्या व न्यायालयीन याचिकांमुळे प्रकल्पाचे काम अनेक वर्षे रखडले. सन २०२४ मध्ये ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आल्यानंतरही पर्यावरणविषयक अडचणींमुळे कामाला अपेक्षित गती मिळाली नाही.

आता या अडचणींवर मात करून बांधकामाला वेग देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला आता गती मिळाली असून सध्या पिलर उभारणी आणि गर्डर बसवण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी पर्यावरणविषयक व अन्य प्रशासकीय अडचणींमुळे या प्रकल्पाला विलंब झाला होता. आता उपलब्ध कामाच्या टप्प्यांनुसार बांधकाम पुढे नेण्यात येत असून सन २०२७ अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर ऐरोली, घणसोली आणि परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

वाहतूक कोंडीतून सुटका होणार

ऐरोली-घणसोली उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच एमआयडीसी क्षेत्राकडे जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने आणि तेथून मुंबई, ठाणे, कल्याण व डोंबिवलीकडे जाणाऱ्या वाहतुकीलाही या मार्गाचा फायदा होईल. घणसोली व ऐरोली परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होऊ शकतो. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण होण्याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT