मुंबई: एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाईसजेट यांसारख्या विमान कंपन्यांना विमान इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे फटका बसत आहे. या दर वाढीमुळे विमान कंपन्यांनी आपले कामकाज बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यास सुरुवात केली असून सरकारकडे मदतीसाठी साकडे घातले आहे. इंधनाचे दर वाढत राहिले तर उड्डाणांची संख्या कमी करावी लागेल किंवा अनेक उड्डाणे रद्द करावी लागतील, असा इशारा दिला आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्स या संघटनेने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला तसे पत्र लिहिलेे आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच अनेक देशांच्या हवाई क्षेत्रातील निर्बंधांमुळे लांब पल्ल्याच्या विमान प्रवासाचा खर्चही वाढला आहे. विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चापैकी सुमारे 40 टक्के हिस्सा इंधनावर खर्च होतो. अशा स्थितीत दरवाढीमुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.
इंधन दरवाढीच्या वेगवेगळ्या यंत्रणेमुळे असमतोल निर्माण होत आहे. गेल्या महिन्यात सरकारने देशांतर्गत उड्डाणांसाठी इंधन दरवाढ 15 रुपये प्रति लिटरपर्यंत मर्यादित ठेवली होती. मात्र आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी यामध्ये 73 रुपये प्रति लिटर इतकी मोठी वाढ करण्यात आली. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विमान सेवा चालवणे कठीण झाले असून कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
विमान कंपन्यांच्या मागण्या
ऑक्टोबर 2022 मध्ये लागू केलेली क्रॅक बँड यंत्रणा पुन्हा लागू करावी, जेणेकरून कच्चे तेल आणि इंधन दरात ताळमेळ राहील. इंधनावर लावले जाणारे 11 टक्के उत्पादन शुल्क तात्पुरते स्थगित करण्यात यावे.