मुंबई ः वायू प्रदूषणामुळे देशातील महानगरांमध्ये श्वास घेणे कठीण झाले आहे. प्रदूषित हवेमुळे श्वसनाचे विकार जडतात. फुप्फुसे कमजोर होतात, अशीच सर्वसामान्य धारणा आहे, मात्र नव्या संशोधनानुसार या प्रदूषणामुळे मेंदूलाही धक्का पोहोचतो, असा धक्कादायक निष्कर्ष वैद्यकीय तज्ज्ञांनी काढला आहे. यातील धोकादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या काळात आपल्या मेंदूला काही आजार जडलाय हे लक्षातही येत नाही.
वायू प्रदूषणामुळे मेंदूच्या प्रत्येक भागावर घातक परिणाम होतो. विस्मरणापासून ते मेंदूतील रक्तस्रावापर्यंत प्रकरण जाते. यथार्थ रुग्णालयातील मेंदू विकार विभागाचे अध्यक्ष आणि समूह संचालक डॉ. कुणाल बहराने यांच्या म्हणण्यानुसार प्रदूषित शहरांमध्ये आपण मेंदूचा धोका घेऊन वावरत असतो. प्रदूषित हवेतील विषारी कण मेंदूचा ताबा घेतात. त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क घालणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रदूषित हवेतील कण फुप्फुसात जातात त्यामुळे श्वसनाचे विकार जडतात. दम्यासारखा गंभीर आजार होतो. हे सर्वांना माहीत असलेले आजार आहेत, पण त्यापलिकडे हवेतील घातक घटक विशेषतः पीएम 2.5 हा घटक रक्तप्रवाहातून नाकाद्वारे थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे जळजळ होणे, चयापचय क्रिया बिघडणे, रक्तप्रवाह बिघडणे, मेंदूच्या पेशींपर्यंत पोहोचून मेंदूच्या प्रक्रियेत अडथळा आणणे असे प्रकार घडू लागतात. त्यामुळे अकाली वृद्धत्त्व येणे, मेंदूंचे घातक विकार जडणे आदी व्याधी जडू लागतात. दीर्घकाळ प्रदुषित हवेच्या संपर्कात राहिल्यास स्मरणशक्ती कमी होणे, एकाग्रचित्ताचा अवधी कमी होणे, विस्मरण होणे, कधीकधी पूर्णतः स्मृतिभ्रंश होणे, अकाली वृद्धत्त्वाची लक्षणे दिसणे आदी परिणाम दिसू लागतात.