आशिष शिंदे
कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्तीच्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. प्रत्यक्षात नदीचे पाणी इतके प्रदूषित आहे की, पिण्यासाठीच नव्हे तर आंघोळीसाठीही ते घातक आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदूषणमुक्तीची घोषणा करणार्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातून पंचगंगेच्या प्रदूषणावर अधिकृत प्रकाशझोत टाकला आहे. 2018 पासून आतापर्यंत देशातील प्रदूषित नद्यांच्या यादीत पंचगंगेचा समावेश कायम आहे. त्यामुळे गेल्या आठ वर्षांत पंचगंगा मुक्तीसाठी काय केले? हा प्रश्न या अहवालाने उपस्थित केला आहे. राज्यातील 54 नद्यांचे प्रवाह प्रदूषित असून, यामध्ये काळू, मिठी, भीमा, मुळा-मुठा, पवना या नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत.
जैवविघटनक्षम प्राणवायू मागणी वाढल्यास पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कमी होतो. परिणामी, मासे मरतात, पाण्याला दुर्गंधी सुटते, शेवाळ वाढते आणि पाण्यातील जैवविविधता धोक्यात येते. पंचगंगा नदीचा शिरोळ ते कोल्हापूर हा प्रवाह सीपीसीबी 2025 च्या अहवालात अधिकृतपणे प्रदूषित नदीप्रवाह म्हणून नोंदवला असून, तिची स्थिती ‘प्राधान्य श्रेणी 5’मध्ये कायम असल्याचे सांगितले आहे. इचलकरंजी एमआयडीसीजवळील शिरदवाड घाट परिसरात पंचगंगेच्या बीओडीचे अधिकतम मूल्य 2024 मध्ये 7.5 मि.ग्रॅ.प्रतिलिटर इतके नोंदविले गेले.
जितका बीओडी कमी तितके पाणी स्वच्छ
जैवविघटनक्षम प्राणवायू मागणी (बीओडी) म्हणजे पाण्यातील सेंद्रिय कचरा, मलजल किंवा सांडपाणी विघटित करण्यासाठी जीवाणूंना लागणार्या विरघळलेल्या प्राणवायूची मात्रा. बीओडी हा पाण्याच्या स्वच्छतेचा सर्वात महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो. जितका बीओडी कमी तितके पाणी स्वच्छ आणि बीओडी जितका जास्त, तितका प्रदूषणाचा धोका अधिक.
राज्यातील ‘या’ नद्या प्रदूषितच
श्रेणी 1 काळू नदी, मिठी नदी
श्रेणी 2 भीमा नदी, मुळा नदी, मुळा-मुठा, पवना
श्रेणी 3 बिंदुसरा, पेडी, सीना, चंद्रभागा, गोदावरी, इंद्रायणी, कुंडलिका, नीरा, सावित्री
श्रेणी 4 अंबा, घोड, कोळार, कोयना, मांजरा, मोरना, वेल, कन्हान, कृष्णा, पाताळगंगा, पैनगंगा, सूर्या, तापी, वेण्णा, वैनगंगा
श्रेणी 5 पंचगंगा, भातसा, गोमाई, कान्ह, पांझरा, रंगवली, तानसा, उल्हास, वैतरणा, पूर्णा, दारणा, गिरणा, हिवरा, बोरी, वर्धा.