Aditya Mohit Meeting Pudhari
मुंबई

Aditya Mohit Meeting: आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या घरी; महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांचा धुरळा

वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांची उपस्थिती; राजकीय मनोमिलनाची चर्चा, विरोधकांची टीका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेशी (ठाकरे) हाडवैर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मोहित कंबोज यांच्या निवासस्थानी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लावलेल्या उपस्थितीने महाराष्ट्राच्या राजकारणात टीकेचा ‌‘धुरळा‌’ उडाला आहे. आदित्य यांच्या उपस्थितीने ठाकरे आणि कंबोज यांच्यातील राजकीय संघर्षाला पूर्णविराम मिळून दोघांचेही मनोमिलन झाले आहे काय, अशी चर्चा रंगली आहे, तर विरोधकांच्या शुभकार्याला जाणे काही गैर नाही, असे म्हणत ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी या भेटीवरून आदित्य यांची पाठराखण केली आहे.

मोहित कंबोज यांच्या मुलीचा शनिवारी वाढदिवस साजरा झाला. मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने मोठ्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कंबोज यांनी वाढदिवसासाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजकांना निमंत्रित केले होते. या निमंत्रितांमध्ये ठाकरे सेनेचे नेते, आमदार आदित्य ठाकरे हेसुद्धा कंबोज यांच्या मुलीला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

या भेटीचे राज्याच्या राजकारणात पडसाद उमटताच अनेक तर्क-वितर्क काढले जाऊ लागले. सत्ताधारी पक्षांबरोबरच विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही टीकेबरोबरच विविध चर्चाही रंगल्या होत्या.

भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत : मंत्री शिरसाट

शिंदे गटाने या भेटीवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आदित्य गेले असतील तर यामध्ये वाईट काहीच नाही; पण त्यांच्या मनामध्ये काय चाललेय हे पाहिले तर जे यापूर्वी प्रमाणाच्या बाहेर बेछूट आरोप करीत होते त्याचे काय झाले, असा सवाल उपस्थित करत याचे कारण म्हणजे ते भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत, म्हणून ते कार्यक्रमाला गेले होते, अशी टीका शिंदे सेनेचे नेते व मंत्री संजय शिरसाट यांनी केली.

वैचारिक संघर्ष थांबत नाही : खा. संजय राऊत

विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, आदित्य हे थोड्या वेळासाठी तेथे उपस्थित होते. मंगल कार्यक्रमाला कोणी बोलावले असेल तर राजकीयदृष्ट्या पाहू नये. विरोधकांच्या घरी अनेकदा आम्ही अशा कार्याला गेलो आहोत. बाळासाहेब ठाकरे, शरद पवारही अनेकदा गेले आहेत. हे तेवढ्यापुरते असते, बाकी आमचा वैचारिक संघर्ष थांबत नाही, असेही राऊत म्हणाले.

फडणवीस सर्वांचे ‌‘बॉस‌’: नितेश राणे

आदित्य-कंबोज भेटीबाबत पत्रकारांनी मंत्री नितेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले, विरोधकांकडे पर्याय राहिलेला नाही, दुकानात माल राहिलेला नाही, सर्व भांडवल संपलेले आहे. त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. आता फडणवीस हे सर्वांचेच बॉस होणार आहेत, असा टोलाही राणे यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT