Abhijat Marathi Book Exhibition Mumbai Pudhari
मुंबई

Abhijat Marathi Book Exhibition Mumbai: ‘अभिजात’ मराठी पुस्तक प्रदर्शनात साहित्यसंपदेचा महोत्सव; शिवचरित्रांपासून पु.लंपर्यंत वाचकांची गर्दी

राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून भव्य आयोजन; आंबेडकर, अण्णाभाऊ, खांडेकर ते समकालीन लेखकांच्या पुस्तकांना उस्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून गुरुवारपासून सुरू झालेल्या ‌‘अभिजात‌’ मराठी पुस्तक प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज या वीरपुरूषांबरोबच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेले आणि त्यांच्यावर प्रकाशित झालेले वाड्मय, वि. स. खांडेकर, मराठी साहित्याचे कधीही न कोमजणारे हिरवे पान पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे आदींचेच अधिराज्य असल्याची प्रचिती येत आहे.

एक मार्चपर्यंत चालणाऱ्या या भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवारी मुंबईतील संपादकांच्या हस्ते तितक्याच फिती कापून झाले. स्वतचा ग्रंथ संभार बाळगून असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते. उद्घाटनाच्या आधी आणि नंतर अवांतर गप्पाष्टके झाली आणि या दरम्यान पुस्तक प्रदर्शनाचा औपचारिक फेरफटका मारत विचारवंत संपादकांनी आपल्या ग्रंथ निष्ठेची सपादनी केली.

या प्रदर्शनात केवळ कथासंग्रह, कांदबरी, कवितासंग्रहच नाही तर समीक्षात्मक ग्रंथ, धार्मिक, खाद्यपदार्थविषयक पुस्तके, प्रेरणादायी विचार, बालसाहित्याची प्रशस्त दालने आहेत. या ग्रंथ महोत्सवाला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद आहे, परंतू हा प्रतिसाद शनिवार - रविवारी अधिक चांगला मिळेल, तो गेल्या वर्षीसारखा भरघोस असेल, असा विश्वास प्रकाशकांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केला. पु.ल.देशपांडेंची बटाट्याची चाळ, मारूती चितमपल्ली यांचे चकवा चांदणं, जयंत नारळीकर यांचे चार महानगरातील दिवस या पुस्तकांना वाचकांचा मोठा प्रतिसाद असल्याचे मौज प्रकाशनचे गणेश जोशी यांनी सांगितले. ‌‘माझ्या आयुष्यात काय घडले” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मलेखनासह बिल गेट्स, वॉरेन बफेट, स्टीव्ह जॉब्स, इलॉन मस्क यांच्यासह रतन टाटा यांच्या संध्या रानडे यांनी अनुवादित केलेल्या रत्नांकित पर्व या आत्मचरित्राकडेही मुंबईकर वाचकांना ओढ आहे. जपानी नागरिकांच्या जीवनशैलीवर आधारित ‌‘इकिगाई‌’ पुस्तकासह, आई-बाबांसाठी कानमंत्र या पुस्तकाला चांगली मागणी असल्याचे मायमिरर प्रकाशनाचे मनोज आंबिके यांनी नमूद केले.

अशोक समेळ यांच्या ‌‘महाभारतातील अश्वत्थामा‌’ आणि ‌‘ते आभाळ भीष्माचं होत‌’ या साहित्यकृतींसह ‌‘लता दीदी... ते रत्न भारताचे‌’ या आत्मचरित्रपर पुस्तकांना चांगला प्रतिसाद असल्याचे डिम्पल प्रकाशनाचे गोपीनाथ मयेकर यांनी सांगितले.

साहित्य अकादमीच्या ग्रंथदालनात संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जन्मचतुः शताब्दी निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या वासुदेव बळवंत पटवर्धन, गणेश हरी केळकर लिखित श्री तुकारामाच्या अभंगाची चर्चा - खंड 2 या ग्रंथाच्या प्रती अधिक विकल्या जात आहेत. बाबासाहेब पुरंदरे आणि यदुनाथ सरकार यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या ग्रंथांनाही मागणी आहे. गेल्या वर्षी छावा चित्रपटामुळे लक्षणीय विक्री झालेल्या छावा कांदबरीची क्रेझ जरा कमी झाली आहे. पण मागणी मात्र आहेच, असे मॅजेस्टिक प्रकाशनचे विवेक गावडे म्हणाले.

बालवाड्मयासह, कायदेविषयक पुस्तके, श्रीकांत सिनकर, बाबुराव अर्नाळकर, गुरूनाथ नाईक यांच्या कथा आणि कांदबर्यांना प्रतिसाद असल्याचे मनोरमा प्रकाशनाचे धनदा फडके यांनी सांगितले.

दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या अग्निपंखला, तसेच लोक माझा सांगाती या शरद पवार यांच्या आत्मचरित्राला मागणी असल्याचे मधुश्री प्रकाशनच्या मंडळींनी नमूद केले.

व. पु. काळे, पु. ल. देशपांडेची पुस्तके आम्ही वाचतो, पण वि.स. खोडेकर यांची लेखन पध्दती समजावून घ्यायची होती म्हणून या प्रदर्शनातून त्यांचे ‌‘अश्रू‌’ हे पुस्तक आम्ही घेतले. आम्ही श्राव्य माध्यमातून उपलब्ध असलेले साहित्यही ऐकतो. पण पुस्तक प्रदर्शनांना आवर्जून भेट देतो
यश आणि स्नेहा तांबे, विरार

ठाण्यात आम्ही वाचनालय चालवतो. आमच्या वाचकांसाठी या प्रदर्शनातून पु.ल.देशपांडेंची बटाट्याची चाळ, मारूती चितमपल्ली यांचे चकवा चांदणं, मराठी रंगभूमीच्या 30 रात्री चे या मकरंद साठे च्या लेखनाचे सर्व खंड, निखळत्या

चौकटीत -अंजळी ढमाळ, वसंत वसंत लिमये यांचे टार्गेट आयन रँडचे ॲटलस हे मुग्धा कर्णिकांचे अनुवादित, मेघना पेठेंचे डंदॅट् बींदेअर्‌‍ हे नवंकोरं पुस्तक, आयन रँडचे ॲटलस अशी पुस्तके वाचकांसाठी खरेदी केली, असे माधव टिळक यांनी सांगितले.

कथासंग्रह, कांदबरी, कवितासंग्रहच नाही तर समीक्षात्मक ग्रंथ तसेच लोकवाड्मय गृह प्रकाशनातील ‌‘खोल खोल दुष्काळ डोळे‌’ तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा. शरद बावीस्कर यांचे ‌‘भुरा‌’ हे आत्मचरित्र या दोन्ही पुस्तकांना मागणी आहे. याशिवाय ‌‘शिवाजी कोण होता?‌’ या गोविंद पानसरेंच्या पुस्तकाच्या मराठीतील प्रतींना प्रचंड प्रतिसाद आहे.
नितीन जाधव, लोकवाड्मय गृह

या पुस्तकांना वाचक पसंती: रावण शरद तांदळे, साथसंगत - सई परांजपे, खोल खोल दुष्काळ डोळे - प्रदीप कोकरे, भुरा - शरद बावीस्कर, नाझी - भस्मासुराचा उदयास्त -वि. ग. कानिटकर, सो कुल टेक -2 - सोनाली कुलकर्णी, एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर, वि. स. खांडेकर ययाती, सर्कल ऑफ लाईफ - सुधा मूर्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT