

मुंबई : नमिता धुरी
कमीत कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय; मग व्हिडिओ हिंदी किंवा इंग्रजीतच हवा. मराठी समजणाऱ्यांची लोकसंख्या कमी आहे, मग मराठीत व्हिडिओ बनवून व्हायरल कसं होता येईल ? अशाच काहीशा गैरसमजातून काही मराठी तरूण मंडळी अलीकडे डिजिटल व्यासपीठावर आशयनिर्मितीसाठी हिंदी, इंग्रजीचा आधार घेत आहेत; मात्र त्याच वेळी मराठीत काम करून डिजिटल विश्वात लोकप्रियता मिळवणाऱ्यांनी मराठीबद्दलचे सगळे गैरसमज खोडून काढले आहेत.
एखाद्या कलेची ऑनलाइन शिकवणी, मनोरंजनात्मक किंवा शैक्षणिक आशयनिर्मिती, पर्यटन ब्लॉग्ज किंवा अगदी स्वत:च्या आयुष्यातील दैनंदिन घडामोडी सांगणे, इत्यादी विविध प्रकारे स्वत:चे अस्तित्त्व डिजिटल व्यासपीठावर निर्माण करणे ही बदलत्या काळातील ऊर्मी आहे.
हे करत असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या भावनेतून मराठी तरुणांनी माध्यम भाषा म्हणून हिंदी, इंग्रजीला प्राधान्य दिल्याची उदाहरणे अलीकडे दिसतात. मग मराठीत काम करून लोकांपर्यंत पोहोचताच येत नाही का ? या प्रश्नाचे उत्तर याच तरूणवर्गातील काही जणांनी आधीच देऊन ठेवले आहे.
डिजिटल विश्वातील मनोरंजनात्मक आशयात मराठीला स्थान मिळवून देण्यात भाडिपाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच गिटार शिकू इच्छिणाऱ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यासाठी गिटारगिरीने मराठी भाषाच निवडली. कोकण हार्टेड गर्ल आणि कोकणी रानमाणूस यांनाही लोकप्रियता मिळवण्यासाठी हिंदी, इंग्रजीची गरज कधीच भासली नाही.\
परदेशी भाषांच्या शिकवणी वर्गातील अध्यापनाची भाषा सर्रास इंग्रजी असताना लर्न जर्मन विथ केदार जाधव यांनी जर्मन भाषा मराठीतून शिकवण्याचा उपक्रम सुरू केला. जर्मन हिंदीतून शिकवतानाचे त्यांचे व्हिडिओ जेवढे लोकप्रिय आहेत तेवढीच लोकप्रियता मराठीतून जर्मन शिकवण्यालाही मिळाली. आशयाची मांडणी, सातत्य आणि तांत्रिक कौशल्य हे गुण असतील तर मराठीत काम करूनही लोकप्रिय होता येते, हेच यातून सिद्ध होते.
भाषेपेक्षा कौशल्य आणि सातत्य महत्त्वाचे आहे. गिटारगिरी मराठीतून सुरू करण्याचा निर्णय योग्यच असल्याचे आज आम्ही खात्रीने सांगू शकतो. कामामध्ये सातत्य असेल तर अर्थार्जनही करता येते. मराठीतून गिटार शिकणारी ही पहिलीच ऑनलाइन कम्युनिटी आहे. हिंदी, इंग्रजीतून गिटार शिकताना ज्या संज्ञा कळत नाहीत त्या मराठीतून शिकताना कळत असल्याचा अभिप्राय आम्हाला मिळतो. महाराष्ट्रासह 30 देशांमधील हजारो गिटारप्रेमी आमच्याशी जोडले गेले आहेत.
अश्विनी सुर्वे, सहसंस्थापक, गिटारगिरी
इन्स्टाग्रामवर 6 ते 7 दशलक्ष फॉलोअर्स असलेल्यांना सर्वात मोठा आशयनिर्माता मानले जाते; मग मराठी बोलणाऱ्यांची संख्या तर 90 दशलक्ष आहे. त्यामुळे मराठीत व्यक्त होऊ शकणाऱ्यांनी चांगला आशय मराठीत आणावा. फ्रेंचमधला देजाऊ आणि कोरियन भाषेतला सारंगे हा शब्द आपल्यापर्यंत पोहोचला. याच पद्धतीने मराठी भाषेला जागतिक स्तरावर पोहोचवता येईल. मला मराठीत चांगल्याप्रकारे व्यक्त होता येते. लेखक म्हणून जी माझी भाषा आहे तीच भाडिपाची भाषा होत गेली. भाषेपेक्षा तुमचं व्यक्तिमत्त्व, प्रामाणिकपणा, स्वरचित आशय, नावीन्य, सातत्य याच गोष्टी तुम्हाला पुढे घेऊन जातात. मानवी प्रवृत्तीवर भाष्य करणारा आशय सर्व भाषिकांना आपलासा वाटतो.
सारंग साठ्ये, भाडिपा