आदित्य ठाकरे File Photo
मुंबई

Aaditya Thackeray : मुंबईत 5 लाख 86 हजार दुबार मतदार

शिवसेनेच्या आमदाराचे सात वेळा, तर माजी महापौरांचे आठ वेळा नाव

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत 5 लाख 86 हजार लोकांची दुबार नोंदणी करण्यात आली आहे. नियमानुसार 1 जुलै 2025 नंतर मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करता येत नाहीत. असे असतानाही या यादीत तब्बल 33 हजार नवीन मतदार कसे काय आले? त्यांच्या नावावर बोगस मतदान करण्याचा डाव आहे का ? असा प्रश्न उबाठा शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

दुबार मतदार यादीत शिवसेनेचे विधानपरिषद सदस्य सुनील शिंदे यांचे नाव 7 वेळा, तर माजी महापौर श्रद्धा जाधव यांचे नाव 8 वेळा आढळून आले आहे, नाव एकच असले तरी त्यावरील व्यक्तीचे फोटो आणि वय यामध्ये मोठी तफावत आहे. तसेच धारावीतील काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड आणि शिवसेना (ठाकरे) खासदार अनिल देसाई यांचे नाव दुबार यादीत आले आहे. विशेष म्हणजे मराठी मतदारांची मतदार यादीत मोठ्या प्रमाणात नावे घुसवण्यात आली आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष गायकवाड यांच्या मतदारसंघात बोगस मतदान करणाऱ्या व्यक्तीला पकडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिकेतील प्रारूप मतदार यादीतील गोंधळावरही बोट ठेवले.

ते म्हणाले, मुंबईतील दुबार मतदार यादीवर आक्षेप घेतल्यानंतरही निवडणूक आयोगाकडून सुधारणा होताना दिसत नाही. एकप्रकारे ही थट्टा आहे. याबाबत मुंबईतून चार हजारहून अधिक हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. यावर निवडणूक आयोगाने तातडीने खुलासा करावा, अशी मागणीही आदित्य यांनी केली. आयोगाने जाहीर केलेल्या मुंबईतील 227 वॉर्डच्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी आहेत. यासंदर्भात सुमारे चार हजार हरकती नोंदवल्या. अद्याप त्याची दखल घेण्यात आलेली नाही.

बीएलओ अशिक्षित

दुबार नावावर संशय असल्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक शाखेत दुबार नाव आणि बोगस मतदार शोधण्याचे काम सुरू आहे. दुबार मतदारांच्या नावासमोर आयोगाने अद्याप स्टार चिन्ह नोंदवले नाही. मयत मतदारांचे मृत्यू प्रमाणपत्र जोडल्यानंतर देखील अशी नावे वगळण्यात आलेली नाहीत. पत्ता बदलल्याचे कागदपत्र देऊनही त्यामध्ये सुधारणा करण्यात आली नाही.

निवडणूक आयोगाने नेमलेले बीएलओ अशिक्षित आहेत. ज्यांना वाचता,लिहिता येत नाही, अशा बीएलओला मतदार यादी तपासण्याचे काम दिले आहे. आयोगाचा हा भोंगळ कारभार असल्याची टीकाही त्यांनी केली.

11 लाख दुबार मतदार

मुंबईमध्ये तब्बल 11 लाख दुबार मतदार आढळल्याचा आरोप एका वृत्तवाहिनीने केला आहे. त्याचबरोबर नांदेड येथील कोचिंग क्लासच्या पत्त्यावर शेकडोहून अधिक मतदारांची नावे नोंदवल्याचा प्रकार उघड झाल्याचे या वाहिनीने म्हटले.

लोकचळवळ उभी करण्याचा इशारा

आयोगाला वारंवार पत्र देऊनही कार्यवाही केली जात नाही. आयोग कोणाच्या आदेशाची वाट बघत तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करत याविरोधात लोकचळवळ उभी करू. तसेच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचे विविध वाहिन्यांवर पाहण्यात आले आहे. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. यावरून निवडणुका किती पारदर्शक होतील, हे दिसत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT