मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. Pudhari News
मुंबई

संभाजीनगरात गुंतवणुकीचा व्हिएतनामला प्रस्ताव

हो चि मिन्ह सिटी पर्यंत विमानसेवा प्रारंभ करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

पुढारी वृत्तसेवा

A proposal for investment in Sambhajinagar has been presented to Vietnam

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील संबंध अधिक बळकट करण्यासाठी महाराष्ट्र विश्वासार्ह भागीदार म्हणून कार्य करण्यास सज्ज आहे. व्हिएतनाम सोबत सांस्कृतिक, आर्थिक आणि परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान आयोजित इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी व्हिएतनामच्या उद्योजकांना गुंतवणुकीसाठी राज्यात येण्याचे आवाहन केले.

फडणवीस यांनी भारत आणि व्हिएतनाम भागीदारी अधिक दृढ होऊन 'एन्हान्स्ड कॉम्प्रेहेन्सिव्ह स्टूटेजिक पार्टनरशिप' नव्या स्तरावर नेल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचा समृद्ध वारसा सांगताना मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारुन त्याला आधुनिक काळात मिळवून दिलेल्या अधिष्ठानाचा परिचय दिला. तसेच युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेली अजिंठा आणि वेरुळ येथील बौद्ध आणि जैन लेणी येथे व्हिएतनामच्या गुंतवणुकदारांचे स्वागत केले. छत्रपती संभाजीनगर आणि हो चि मिन्ह सिटी यांच्यात थेट हवाई सेवा सुरू करण्यासह स्वतंत्र बौद्ध पर्यटन सर्किट विकसित करण्याचा प्रस्ताव त्यांनी यावेळी मांडला.

मुंबई आणि हो चि मिन्ह सिटीमध्ये साधर्म्य असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही शहरांमध्ये नुकत्याच झालेल्या कराराचे स्वागत केले. तसेच व्हिएतनाम कंपनी विनग्रूपच्या महाराष्ट्रातील ६.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या प्रस्तावित गुंतवणुकीच्या कराराचे स्वागत करताना हा दक्षिण पूर्व आशियातून झालेला सर्वात मोठा करार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, गडचिरोली आदी शहरांमध्ये असलेल्या औद्योगिक संधींबद्दल माहिती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिएतनामच्या उद्योजकांना उद्योग, ऊर्जा, औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले.

मुंबई आणि पुणे येथील औषधनिर्माण क्षेत्र जागतिक दर्जाचे असून व्हिएतनामला परवडणारी जेनेरिक औषधे आणि लसींचा विश्वासार्ह पुरवठा करण्याची क्षमता राज्यात असल्याचेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र-व्हिएतनाम व्यावसायिक परिषद दरवर्षी मुंबई आणि हो चि मिन्ह सिटी येथे आळीपाळीने आयोजित करण्याचाही प्रस्ताव मुख्यमंत्री यांनी मांडला. व्हिएतनामच्या प्रतिनिधींच्या मुंबईतील पहिल्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीसाठी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

भारत-व्हिएतनाम द्विपक्षीय व्यापार सातत्याने वाढत असल्याचे सांगून यामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होत असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. इलेक्ट्रिक वाहने, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान सेवा, ऊर्जा आणि उद्योग क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांच्यात सहकार्याच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक भारतीय उद्योग व्हिएतनाममध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असून हे सहकार्य भविष्यातील व्यापार आणि उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सर्वंकष आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी उद्योग, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी या फोरममध्ये बोलताना केले. मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक आणि औद्योगिक केंद्र असून येथे आयोजित हा कार्यक्रम भारत-व्हिएतनाम संबंधांना नवी दिशा देणारा असल्याचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नमूद केले. बदलत्या जागतिक परिस्थितीत आर्थिक सहकार्य, जागतिकीकरणातील नव्या संधी आणि विश्वासार्ह भागीदारीचे महत्त्व अधिक वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT