Police Case filed against MLA Rohit Pawar in Mumbai
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी शासकीय कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून एका व्हायरल व्हिडिओमध्ये रोहित पवार पोलीस उपनिरीक्षकावर मोठ्याने ओरडताना दिसत आहेत.
या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये रोहित पवार एका पोलीस अधिकाऱ्यावर "आवाज कमी ठेव, नाहीतर धडा शिकवीन" असे म्हणताना स्पष्टपणे ऐकायला मिळते.
महाराष्ट्र विधानभवनात झालेल्या गोंधळादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय कार्यकर्ता नितीन देशमुख यांना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी मारहाण केली, असा आरोप करण्यात आला आहे.
या वादात सहभागी असलेले दोन्ही गट विधानभवनातच ताब्यात ठेवण्यात आले. नंतर सर्वांना मरीन ड्राईव्ह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे देशमुख यांचा शोध घेण्यासाठी आझाद मैदान पोलीस ठाण्यात पोहोचले.
तेथे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट माहिती न दिल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी एका पोलीस उपनिरीक्षकाशी जोरदार वाद घातला. या वादामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला.
घटनेनंतर रोहित पवार यांनी विधान भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्ही आमच्या कार्यकर्त्याच्या स्थितीबद्दल विचारण्यासाठी आलो होतो. मात्र पोलीस योग्य माहिती देत नव्हते. त्यांनीच आवाज चढवला, म्हणून वाद झाला."
पोलीसांची कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी रोहित पवार यांच्यावर शासकीय कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा आणि सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. संबंधित कलमांखाली त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई शहर अध्यक्ष ॲड. अमोल मातेले म्हणाले की, विधानभवनाच्या लॉबीमध्ये मारहाण करणारे मोकाट आहेत आणि रोहित पवारांवर गुन्हा दाखल होतो हे आश्चर्यकारक व संतापजनक आहे.
PSI गोपणे यांनी उद्धट वर्तन करत आमदार रोहित पवार यांना हातवारे करत बाहेर जाण्यास सांगितले. ‘तो इथे नाही, चौकीत आहे, असे उडवाउडवीचे उत्तर दिले गेले. त्यामुळे परिस्थिती चिघळली.
या घटनेत सहभागी असलेले चार आरोपी अद्याप मोकाट आहेत. जर त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून अटक केली नाही, तर नरिमन पॉईंट पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा ॲड. मातेले यांनी दिला आहे.