मुंबई

362 कोटींचे हेरॉईन पनवेलनजीक जप्त

Shambhuraj Pachindre

पनवेल ः पुढारी वृत्तसेवा पंजाब पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांच्या मदतीने जेएनपीटी बंदरातून आलेले तब्बल 362.9 कोटींचे हेरॉईन जप्‍त केले. सहा महिन्यांपूर्वी दुबई येथून कंटेनरमध्ये आलेला हा साठा आजीवली गावाच्या हद्दीत नवकार लॉजिस्टिकमध्ये ठेवण्यात आला होता. राज्यातील अमली पदार्थ विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला पंजाब पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन सेलने जेएनपीटी येथे दुबई येथून 15डिसेंबर 2021 रोजी कंटेनरमध्ये अमली पदार्थ दडवून भारतात आणल्याची, तसेच या कंटेनरमधील माल घेण्यासाठी अद्यापही कोणी आले नसल्याची माहिती मिळाली होती.

नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी या माहितीची गंभीर दखल घेऊन पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली व अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने या कंटेनरचा शोध घेतला असता, हा कंटेनर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेलजवळच्या आजिवली गावातील नवकार लॉजिस्टिक येथे उतरविण्यात आल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकाने कंटेनरची पंचासमक्ष पाहणी केली. या कंटेनरमधील मार्बल्स पुर्णपणे बाहेर काढल्यानंतर कंटेनरच्या दरवाजाला असलेल्या फ्रेममध्ये अमली पदार्थ लपवला असल्याचा संशय बळावला. कंटेनरचा दरवाजा व त्यावरील फे्रम कटर मशिनच्या सहाय्याने कापण्यात आली असता त्यामध्ये 72.518 कि.ग्रॅ. वजनाचे सुमारे 362.59 कोटी रुपये किमतीचे प्लास्टिक कागदाच्या वेष्टनामध्ये पॅक केलेले एकूण 168 हेरॉईनचे पॅकेट्स आढळली.

या प्रकरणी अमली पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8 (क), 22 (क), 23 (क), 29 कलमान्वये सदरचा अमली पदार्थ (हेरॉईन) संगनमत करून अवैधरित्या भारतात आयात करणारे, निर्यात करणारे, शिपर्स व आयात व निर्यात दरम्यान प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या मदत करणार्‍या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेच्या या विशेष तपास पथकांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT