गवसेत टस्करचा धुमाकूळ; शेडसह 3 वाहनांचेे नुकसान | पुढारी

गवसेत टस्करचा धुमाकूळ; शेडसह 3 वाहनांचेे नुकसान

गवसे ः पुढारी वृत्तसेवा गवसे (ता. आजरा) परिसरात टस्करने धुमाकूळ घातला आहे. गुरुवारी रात्री या टस्करने रेमेत फर्नांडिस यांचा टेम्पो व दोन दुचाकींची नासधूस केली. बराच वेळ आजरा-आंबोली रस्त्यावर हत्तीने ठाण मांडल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हत्ती बिथरला असून, तो लोकांच्या अंगावर धावून जात आहे. गवसे येथील जंगलात ठाण मांडलेल्या हत्तीने पिकांचे नुकसान सुरू केल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी हत्तीने श्रीपती पेडणेकर व महादेव पेडणेकर यांच्या शेतातील पाईपलाईन व उसाचे नुकसान केले. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री रेमेत फर्नांडिस यांच्या घरासमोरचे फणस खाऊन त्यांच्या वाहनांचे शेड पाडले. शेडमध्ये लावण्यात आलेला टेम्पो उलटून टाकला. त्याखाली सापडलेल्या दोन दुचाकींचेही नुकसान झाले. बिथरलेला हत्ती जोरजोरात आवाज करीत असल्याने फर्नांडिस व त्यांचे कुटुंबीय घाबरून घराबाहेर आले नाहीत.

त्यानंतर हत्तीने आपला मोर्चा आजरा-आंबोली रस्त्याकडे वळविला. बराच वेळ हत्तीने रस्त्यावर ठाण मांडले होते. त्यामुळे मुसळधार पावसात रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वेळाने हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेला. वन विभागाने हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

Back to top button