नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, 'या' 34 ठिकाणी लसीकरण केंद्र | पुढारी

नाशिक : सव्वासात लाख नागरिकांना शहरात मोफत बूस्टर डोस, 'या' 34 ठिकाणी लसीकरण केंद्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने संभाव्य चौथ्या लाटेचा सामना करण्याच्या दृष्टीने मोफत बूस्टर डोस देण्यात येणार असून, शासनाच्या आदेशानुसार नाशिक शहरात सव्वासात लाख नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (दि.15) 34 ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहरात आजपर्यंत अवघ्या 74 हजार 938 नागरिकांनी बूस्टर डोस घेतला आहे.

पहिल्या आणि दुसर्‍या लाटेमध्ये अनेक नागरिकांना कोरोनाचा सामना करावा लागला. यानंतर ओमायक्रॉन या नवीन व्हेरियंटमुळे तिसरी लाट घातक ठरण्याचा इशारा शासनाकडून देण्यात आला होता. मात्र, मोठ्या प्रमाणावर झालेल्या लसीकरणामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत हानी टळली. यामुळे सर्वांनाच दिलासा मिळाला. नाशिक शहरात आतापर्यंत दोन लाख 73 हजार 524 लोक कोरोना बाधित झाले. त्यापैकी 4,106 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या यापेक्षा दुप्पट असू शकते. सध्या बहुतांश ठिकाणी पुन्हा रुग्ण वाढताना आढळून येत असल्याने चौथी लाट येते की काय असा अंदाज गृहीत धरून केंद्र सरकारने लसीकरण वाढविण्याचे आदेश स्थानिक प्राधिकरणास दिले आहेत.

अवघा सहा टक्केच बूस्टर डोस
18 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या 13 लाख 63 हजार 700 लोकांना लसीकरणाचे उद्दिष्ट नाशिक शहरासाठी होते. त्यापैकी 13 लाख 2 हजार 299 नागरिकांनी पहिला डोस घेतला असून, 10 लाख 58 हजार 652 नागरिकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. तसेच 74 हजार 938 नागरिकांचा बूस्टर डोस पूर्ण झाला आहे. बूस्टर डोस घेणार्‍यांची संख्या अवघी 6 टक्के इतकीच आहे. दोन्ही डोस घेऊन सहा महिन्यांचा कालावधी झालेल्यांची संख्या सात लाख 25 हजार इतकी असल्याची माहिती मनपा वैद्यकीय अधीक्षक
डॉ. बापूसाहेब नागरगोेजे यांनी दिली.

18 वर्षावरील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला असून, शुक्रवारी (दि.15) त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
दुसरा डोस घेऊन सहा महिने झालेल्या नागरिकांनी मोफत बूस्टर डोस घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेने 34 लसीकरण केंद्र सुरू केले असून, मनपाकडे 40 हजार कोविशिल्ड डोस तर कोव्हॅक्सीनचे 25 हजार डोस शिल्लक आहेत. कोविन अ‍ॅप सुरू झाल्यामुळे नियमित लसीकरण तसेच बूस्टर डोसची मोहीम सुरू झाली आहे.

Back to top button