मुंबई: ब्रिटिशकालीन 125 वर्षे जुन्या प्रभादेवी पुलाचे पाडकाम अखेर पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकदरम्यान हे काम करण्यात आले. रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हे काम पूर्ण झाले. त्यामुळे येथे दुमजली पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रभादेवी पुलाच्या पाडकामाला काही महिन्यांपूर्वीच सुरुवात झाली होती. मात्र मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील पुलाचा भाग पाडण्यासाठी मेगाब्लॉक घेणे आवश्यक होते. त्यामुळे शनिवारी रात्री 10.30 वाजल्यापासून रविवारी सकाळी 6 वाजेपर्यंत सीएसएमटी ते दादर दरम्यान उपनगरीय रेल्वेसेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती.
त्यानंतर सकाळी 7.30 वाजता लोकल सेवा रविवारच्या नियमित वेळापत्रकाप्रमाणे सुरू करण्यात आली. यापूर्वी मध्य रेल्वे प्रशासनाने मस्जिद, हँकॉक, कर्णाक, शीव हे ब्रिटीशकालीन उड्डाणपूल पाडले आहेत.
अटल सेतूवरून आलेल्या वाहनांना विनाअडथळा थेट वरळी आणि तेथून पुढे दक्षिण मुंबई, वांद्रे दिशेला जाता यावे यासाठी 4.5 किमीचा वरळी-शिवडी उन्नत जोडरस्ता एमएमआरडीएकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाचे काम 2021 मध्ये सुरू झाले. जानेवारी 2024 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.
पुलाचा वरचा मजला जोडरस्त्याचा भाग
प्रभादेवी व परळ रेल्वे स्थानकांवरून जाणारा 125 वर्षे जुना उड्डाणपूल तोडून त्या ठिकाणी नवीन दुमजली पूल उभारला जाणार आहे. पुलाच्या खालचा भाग पूर्वीच्या पुलाप्रमाणेच स्थानिक वाहतुकीसाठी वापरला जाईल. पुलाचा वरचा मजला मात्र जोडरस्त्याचा भाग असणार आहे.