

मुंबई: शनिवारी सायंकाळी टाटा गार्डनमध्ये एका 55 वर्षांच्या व्यक्तीचा मृतदेह आझाद मैदान पोलिसांनी ताब्यात घेतला. या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मृत व्यक्तीची ओळख पटली असून त्याचे नाव राहुल पंजवानी ऊर्फ पंजाबी असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन हत्येनंतर पळून गेलेल्या अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरु केला आहे.
चर्चगेट येथील नरिमन रोड, बसडेपोजवळील टाटा गार्डनजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती शनिवारी सायंकाळी आझाद मैदान पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
प्राथमिक तपासात या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या केल्याचे निष्पन्न झाले. तपासात त्याचे नाव राहुल पंजाबी असल्याचे उघडकीस आले.त्याची हत्या कोणी केली,या हत्येमागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी जनार्दन रामचंद्र जाधव या पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून मारेकऱ्याचा शोध पोलीस घेत आहेत.