Monsoon Alert Pudhari
महाराष्ट्र

Monsoon Alert: मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढणार! ठाणे, रायगड, रत्नागिरीसह अनेक जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

Monsoon Alert: कोकणात पावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, नागपूरसह राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Monsoon Alert: महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून पुढील काही तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) व्यक्त केली आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, नागपूर यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात २९ जूनपासून मान्सूनने पुन्हा वेग घेतला आहे. हवामान विभागाने राज्यातील २३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तर ५ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस

रविवारी मध्यरात्रीनंतर मुंबईत पावसाचा जोर वाढला. सोमवारी सकाळपर्यंत शहर आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला.

  • सांताक्रूझ येथे सकाळी ८.३० वाजेपर्यंत १०३.१ मिमी पावसाची नोंद झाली.

  • कुलाबा येथे ३०.४ मिमी पाऊस झाला.

  • मुलुंड महानगरपालिका शाळा परिसरात तब्बल २१० मिमी पाऊस झाला.

  • गव्हाणपाडा अग्निशमन केंद्रात १६७ मिमी, वर्सोवा येथे १६७ मिमी, तर गोरेगावमध्ये १२९ मिमी पावसाची नोंद झाली.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

याशिवाय पालघर, सिंधुदुर्ग आणि कोकणातील इतर भागांतही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रालाही यलो अलर्ट

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस आणि जोरदार वाऱ्याची शक्यता आहे.

विदर्भात संमिश्र चित्र

विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये तुलनेने कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

याशिवाय नागपूर, गोंदिया, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागरिकांनी खबरदारी घ्यावी

हवामान विभागाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले आणि पाण्याने भरलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. पुढील २४ ते ४८ तास राज्यातील अनेक भागांसाठी महत्त्वाचे ठरणार असून विशेषतः कोकण आणि घाटमाथा भागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT