

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात रविवारपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली असून रविवारी दुपारपासून सोमवारी सकाळपर्यंत वादळी पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. यामध्ये कुडाळ तालुक्यातील वालावलमधील मुर्तळीवाडी-मुड्याचा कोंड येथील सुधाकर मधुकर राऊळ यांच्या घरावर सोमवारी सकाळी १० वाजता दरडीचा दगड पडून अंशतः तीस हजारांचे नुकसान झाले. यात सुदैवाने जीवितहानी टळली. तर असनिये येथील सावित्री साबाजी सावंत यांच्या घरावर रात्री माड पडून वीस हजारांचे नुकसान झाले. तसेच फोंडाघाटात रविवारी रात्री दरड कोसळून सुमारे ३ तास वाहतूक ठप्प झाली होती.
सिंधुदुर्गात गेल्या २४ तासांत सरासरी ५२.३७ मि.मी पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात ९८ मि.मी झाला. रविवार दुपारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून आता नदी-नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. त्याचबरोबर वादळी वाऱ्याने पडझडीच्या घटनाही घडत आहेत. यामध्ये घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. सोमवारी दुपारी २ वा. वादळामुळे नानेली येथील दत्ताराम आरेकर यांच्या घरावर कौले व पत्रे पडून नुकसान झाले. फोंडाघाटात रविवारी मध्यभागी रात्री ८ वा. च्या सुमारास दरड कोसळून या मार्गातील वाहतूक सुमारे ३ तास ठप्प झाली होती. संबंधित विभागाने जेसीबीने दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सोमवारी सकाळी १० वा. नंतर दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिली; परंतु सायंकाळनंतर पावसाची रिपरिप सुरू झाली होती.