सुप्रसिद्ध कवी, विनोदी सादरकर्ते आणि मिर्झा एक्स्प्रेस म्हणून मराठवाडा-विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात घराघरांत पोहोचलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या निधनाने साहित्यविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियापासून साहित्यिक वर्तुळापर्यंत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यक्षेत्राने एक बहुआयामी व्यक्तिमत्व गमावले आहे.
त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी X वर पोस्ट लिहीत श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट आणि मिर्झा एक्स्प्रेस म्हणून संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात स्थान मिळवलेले डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तुंग विनोदी लोककवी, संवेदनशील साहित्यिक आणि सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व आपण गमावले.
डॉ. मिर्झा यांनी आयुष्यभर साहित्य, विनोद, सामाजिक वास्तव आणि वऱ्हाडी संस्कृती यांची अखंड सेवा केली. 20 हून अधिक काव्यसंग्रह, 6000 पेक्षा जास्त काव्यमैफिली आणि विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अशी उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली. त्यांनी केलेले वृत्तपत्रीय लेखनही प्रचंड लोकप्रिय ठरले. काळाच्या प्रवाहानुसार नवीन माध्यमांचा त्यांनी सहजतेने स्वीकार केला, ही त्यांची जाण आणि लवचिकता विशेष उल्लेखनीय म्हणावी लागेल.
शेती, माती, ग्रामीण जीवन आणि सर्वसामान्य माणसाचे वास्तव हा त्यांच्या कवितेचा गाभा होता. मराठी भाषेवर, विशेषतः वऱ्हाडी बोलीवर त्यांनी जिवापाड प्रेम केले. त्यांच्या योगदानामुळे वऱ्हाडी भाषेचे सादरीकरण राष्ट्रीय पातळीवर पोहोचले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी आहोत.
त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेते, साहित्यिक, कलाकार आणि चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. “आपण एक अष्टपैलू विनोदी लोककवी गमावला” अशी भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाने रिक्त झालेली पोकळी भरून निघणं कठीण असल्याचे जाणकार सांगतात.
संपूर्ण महाराष्ट्रात हशा पिकवणारा हा कवी आज नाही, पण त्यांची कविता, त्यांची शेरो-शायरी, त्यांची खास वऱ्हाडी ठसक्यातली मांडणी आणि समाजासाठीची जागरूकता ही वारसा म्हणून सदैव स्मरणात राहणार आहे.