मुंबई : गिरगाव चौपाटी वरचा विल्सन जिमखाना जैनांनाच्या जिओ नावाच्या संस्थेला लिजवर देण्यात आल्यापासून ख्रिश्चन धर्मियांसह आता गिरगावकर मंडळीही आपल्या हक्काचा जिमखाना गमावल्यामुळे खवळून उठली आहेत. हा जिमखाना मल्लखांब, खो-खो, कबड्डी यासारख्या खेळांसाठी देण्यात यावा, अशी मागणी आम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेने मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गेल्या शंभर वर्षांपासून जास्त काळ गिरगाव चौपाटीवरचा विल्सन जिमखाना विल्सन कॉलेज प्रशासनाला शंभर वर्षांच्या लिजवर देण्यात आला होता. हा जिमखाना दोन वर्षांपूर्वी मुंबईतल्या जैनांनाच्या जिओ या सामाजिक संस्थेला 30 वर्षांसाठी लिजवर देण्यात आल्याने विल्सन कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि ख्रिश्चन धर्मीयांनी प्रशासना विरोधात नाराजीचा सूर उमटला होता. आता याच प्रकरणात गिरगावच्या आम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेनेही उडी घेत गिरगाव चौपाटीवरचा विल्सन जिमखाना परप्रांतीयांच्या घशात न घालता तो गिरगावातल्या तरुण आणि लहान मुलांकरता मल्लखांब, खो-खो, कबड्डी या खेळांसाठी देण्यात यावा अशी मागणी मुंबईच्या जिल्हाधिकारी सौ. आँचल गोयल यांच्याकडे केली आहे.
पूर्वीची मैदाने नगरसेवक, आमदारांनी लाटली आहेत. मुलांचा व्यक्तिमत्व विकास कुठे करावा, असा प्रश्न आम्ही गिरगावकर यांनी उपस्थित केला आहे.त्याचबरोबर विल्सन जिमखाना खूप मोठा असल्याने काही भागांमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टवरून हद्दपार करण्यात आलेल्या कोळी महिलांना व्यवसासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आम्ही गिरगावकर या सामाजिक संस्थेने उचलून धरली आहे. या मागणीमुळे जिओ संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रशासनातही खळबळ माजली आहे.
आम्ही गिरगावकरच्या पदाधिकाऱ्यांनी विल्सन जिमखानाच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असता त्यांनी हा विषय माझ्या काळातला नसल्याचे सांगितले. सोशल मीडियावर मी यासंदर्भातील व्हिडिओ पाहिल्याचेही पदाधिकाऱ्यांना सांगितले. खेळाची मैदाने ही खेळासाठीच राहिली पाहिजे. मैदान कोणत्याही धर्मासाठी नसावे.मी माझ्याकडून पाठपुरावा चालू ठेवते. परंतु यासाठी तुम्हाला महसूल मंत्र्यांना भेटावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.
कोणत्या नियमाखाली कोणत्या कायद्याखाली हा जिमखाना जैनांना देण्यात आला? यासाठी कोणत्या आमदार किंवा मंत्र्याने पत्र तुम्हाला पाठवले होते का, असा प्रश्न आम्ही गिरगावकरच्या शिल्पा मायाकडे मिलिंद पाठक यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्ही माहितीसाठी एक पत्र पाठवा, आम्ही जिमखाना संदर्भातील कागदपत्रे तुम्हाला उपलब्ध करून देऊ, असे त्यांनी उत्तर दिले.
जैन, मारवाड्यांचा येथे काय संबंध, हा जिमखाना विल्सन महाविद्यालय नाही तर आम्हा मूळ रहिवाशांना देण्यात आला पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही लहान मुले व तरुणांना मल्लखांब, कबड्डी, खो-खो यासारखे खेळ विनामुल्य शिकवू असे सांगितले. अन्यथा येत्या काळात मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही आम्ही गिरगावकरच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.