हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ः औंढा तालुक्यातील टेंभुरदरा शिवारात डोक्यात दगड घालून एका महिलेचा खून केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. अहिल्याबाई खुडे (वय 72) असे मृत महिलेचे नाव आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील टेंभुरदरा शिवारात अहिल्याबाई व त्यांची सून शांताबाई या कुटुंबीयासह आखाड्यावर राहतात. रविवारी सायंकाळच्या सुमारास किरकोळ कारणावरुन काही जणांनी शांताबाई यांना मारहाण केली. त्यामुळे त्या जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले.
शेतातील आखाड्यावर अहिल्याबाई एकट्याच होत्या. सोमवारी सकाळी काही शेतकर्यांना अहिल्याबाई यांचा मृतदेह आखाड्याजवळ आढळून आला. त्यांच्या तोंडावर व डोक्यावर दगडाने वार केल्याचे दिसून आले. दरम्यान, या घटनेची माहिती कळमनुरी पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, कळंबोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील निकाळजे, जमादार चाटसे, प्रशांत शिंदे, वाखारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. अहिल्याबाई यांचा खून कोणत्या कारणामुळे झाला, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील आखाडा वरील शेतकर्यांचा जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. तर शांताबाई यांच्या माहितीनंतर नेमके खुनाचे काय कारण आहे, याची माहिती मिळणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताचा शोध सुरू केला असून, त्याच्या मागावर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. शेताच्या कारणावरून हा खून झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचलंत का?