मराठवाडा

हिंगोली : आमदार प्रज्ञा सातव यांच्याकडून विधान परिषदेत अवैध व्यवसायांविरूद्ध लक्षवेधी सूचना

निलेश पोतदार

आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांच्या विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनेमुळे या परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काहींच्या छत्रछायेखाली राहून पोलिसांवर कुरघोडी करून अवैद्य दारू, गुटखा, मटका, जुगार चालविणाऱ्यांमध्ये यामुळे खळबळ माजली आहे.

आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेमध्ये अवैध व्यवसाय विरुद्ध लक्षवेधी सूचना केल्यामुळे आणि त्यांना तीन आमदारांनी समर्थन दिल्याने हा प्रश्न पोलीस प्रशासनाला गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. डॉक्टर प्रज्ञा सातव यांना दोन आठवड्यांपूर्वी कसबे धावंडा तालुका कळमनुरी येथे नागरिकांशी संवाद साधताना एका दारुड्याने दारूच्या नशेमध्ये सातव यांच्यावर हल्ल्‍याचा प्रयत्‍न केला होता, त्या घटनेचे पडसाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात उमटले. एका महिलेवर दारुड्याने केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते.

त्या अनुषंगाने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे कसबे धावंडा येथील बीट जमादार शेख यांनी कर्तव्यात कसूर करून आमदार यांना दारुड्याच्या हल्ला होण्यापासून संरक्षण देण्यात असमर्थता दाखविल्याने त्यांना जिल्हा पोलीस प्रमुख जी श्रीधर यांनी निलंबित केले होते. हा प्रश्न एवढ्यावरच थांबला नाही. नुकतेच प्रज्ञा सातव यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी सूचना मांडल्याने अवैध व्यवसाय करणाऱ्यात खळबळ माजली आहे. आता पोलीस प्रशासन प्रज्ञा सातव यांच्या लक्षवेधी प्रश्नाबाबत काय भूमिका घेते याकडे सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले असून, अवैध धंद्यांना कायमचा आळा घालण्यात पोलीस यशस्वी ठरतील काय याकडे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT