पुणे : महाविकास आघाडीची एकी अन् भाजपच्या चुकीमुळे गड गेला | पुढारी

पुणे : महाविकास आघाडीची एकी अन् भाजपच्या चुकीमुळे गड गेला

सुनील माळी

पुणे : कसबा पेठच्या पोनिवडणुकीत भाजपचे प्रथमपासूनच सारे चुकत गेले अन् काँग्रेसच्या बाजूने प्रथमपासूनच घडत गेले. उमेदवार निवडीचा झालेला घोळ निस्तरता निस्तरता भाजपचा नाकीनऊ आले. महाविकास आघाडीची एकी, उमेदवारी देण्यात झालेली कोंडी यामुळे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला आपला गड गमवावा लागला. महाविकास आघाडी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्या मागे उभी राहिल्याने धंगेकर विजयी झाले.

कसबा मतदारसंघ हा भाजपचा परंपरागत भरभक्कम बालेकिल्ला. त्याचे बुरूज या निवडणुकीत का ढासळले? एकतर कसबा मतदारसंघ हा 2004 च्या निवडणुकीपर्यंत सुमारे सव्वा लाख मतदारांचा होता. सदाशिव, शनिवार, नारायण तसेच कसबा पेठ हा भाग त्यात समाविष्ट होता. त्यातील बहुतांश भाग हा भाजपला मानणार्‍या मतदारांचा असल्याने भाजपचा सहज विजय होत होता.

2004 नंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि तो पावणेतीन लाख मतदारांचा झाला. हे जादा दीड लाख मतदार पूर्वीच्या पर्वती आणि भवानी मतदारसंघातील होते. या दोन्ही मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे परंपरागत मतदार होते. त्यामुळे कसबा मतदारसंघ तेव्हापासूनच निव्वळ भाजपचा उरलेला नव्हता, तरीही 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकांमध्ये भाजपचा विजय झाला.

याची प्रामुख्याने दोन कारणे. पहिले कारण म्हणजे, कसब्याचीच नव्हे तर पुण्याची नाडी माहिती असणार्‍या, स्वपक्षाप्रमाणेच विरोधकांपर्यंत तसेच विविध समाजांशी घट्ट संपर्क असणार्‍या गिरीश बापट यांची उमेदवारी. कसबा समसमान झाला तरी भाजपचा विजय झाला तो गिरीश बापटांमुळे. दुसरे कारण भाजपेतर पक्षांमधील दुही आणि बंडखोरी.

रासने योग्य उमेदवार होते का अयोग्य उमेदवार होते, हा मुद्दाच नव्हता, तर कसब्यात भाजपने रामभाऊ म्हाळगी, अरविंद लेले, अण्णा जोशी, गिरीश बापट, मुक्ता टिळक अशा ब्राह्मण समाजाच्या नेते-कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन मतदारसंघातील त्या समाजाच्या प्राबल्याचा आब राखला होता. त्यातच मुक्ता टिळक यांच्या निधनाने निर्माण झालेल्या भावनिक मुद्द्यावरून टिळक घराण्याकडे उमेदवारी न गेल्याचा ओरखडा त्या समाजाला बसला.

राज्यात ब्राह्मण समाजाला प्रतिनिधित्व देता येईल, अशा जागांपैकी पुण्याच्या कोथरूड आणि कसबा या दोनच जागा होत्या. त्यापैकी राज्याच्या राजकारणासाठी कोथरूडला चंद्रकांत पाटील यांच्यासाठी जागा रिकामी करावी लागल्याने उरली केवळ कसब्याचीच जागा. तिही न मिळाल्याने पिढ्यान्पिढ्या आधी जनसंघ आणि नंतर भाजपबरोबर राहणार्‍या या समाजामध्ये अन्याय झाल्याची जाणीव बळावली. काँग्रेसने त्या जाणिवेला राजकीय हेतूने खतपाणी घातले.

काँग्रेसची उमेदवार निवड अचूक
काँग्रेसने केलेली उमेदवार निवड मात्र अचूक ठरली. या मतदारसंघात दोन वेळा मनसेकडून झुंज दिलेल्या आणि एकदा तर खुद्द बापटच हादरतील, एवढी मते मिळवलेल्या धंगेकर यांना काँगे्रसने उमेदवारी दिली. मुक्ता टिळक यांच्या निधनाच्या खूप आधीपासूनच धंगेकर यांनी मतदारसंघात तयारी केली होती. त्यांचा शहराच्या पूर्व भागात चांगलाच जनसंपर्क आहे. ‘काम करणारा आपला माणूस’ अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यामुळे सामान्य पुणेकरांना ते आपलेसे वाटतात.

शिवसेनेच्या जन्मापासून त्या पक्षाचे कसबा पेठेत कार्यकर्त्यांचे चांगले जाळे आहे. पूर्वाश्रमीच्या शिवसेना, मनसेमध्ये काम केल्याने त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांशी धंगेकर यांची नाळ जुळलेली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्हच त्यांच्यापासून दूर केल्याने पेटलेले शिवसैनिक भाजपचा बदला घेण्यासाठी टपलेले होते. त्यातच भाजपेतर मतांमध्ये फूट होईल अशी दुसर्‍या कुणाचाही उमेदवारी यावेळी नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावेळी काँग्रेसला मनापासून साथ दिली.

त्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांनी मनापासून लक्ष घातल्याने मराठा तसेच मुस्लिम आणि इतर बहुजन समाजावर त्याचा चांगला परिणाम झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रचारात हजेरी लावली. काँग्रेसच्या नाना पटोले, संग्राम थोपटे यांनीही पुण्यात तळ ठोकला होता. स्थानिक नेत्यांमध्ये संपूर्णपणे एकसंधता नव्हती, तरी माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे आदींनी त्यांच्या त्यांच्या बाजू सांभाळल्या.

काहीही करा विचारांचे बुमरँग
निवडणुकीचे पारडे काँग्रेसच्या बाजूने झुकते आहे आणि सामान्य मतदारांच्या तोंडी केवळ धंगेकर हे नाव आहे, हे लक्षात आल्यावर भाजपने साधारणत: दोन आठवड्यांपूर्वी कडवा प्रतिकार करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवस फक्त पुण्यासाठी दिले आणि गल्ली-बोळांपर्यंतचा संपर्क वाढविण्यासाठी हरतर्‍हेने मदत केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच इतरही मंत्री-नेतेगणांना कसब्यात आणण्यात आले; पण काहीही करा, पण सीट आणा’ या विचाराचेच बुमरँग झाल्याचे दिसून येते.

बाजू पलटते आहे, हे कळल्याने ऑक्सिजनच्या नळ्यांची मदत घ्यावी लागेल, अशा शारीरिक स्थितीत असलेल्या गिरीश बापट यांना मेळाव्यात आणण्याची वेळ त्या पक्षावर आली. या सरबत्तीने सामान्य मतदार गांगरला आणि बिथरलाही. निवडणूक शांतपणे हाताळण्याचे, गती हळूहळू वाढवत नेण्याचे, वातावरण हलकेहलके तापवण्याचे एक तंत्र असते. त्याची माहिती असतानाही त्या पक्षाकडून चुका झाल्या.

कसब्याच्या एका पोटनिवडणुकीकडे केवळ पुण्याचे नव्हे तर सार्‍या राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीने पुढील राजकारणाची दिशा ठरणार असल्याची स्पष्ट जाणीव सर्वच पक्षांना होती. एकामागून एक पराभव स्वीकारावे लागल्याने काँग्रेसची निर्माण झालेली पराभूत मनोभूमिका बदलायला यामुळे मदत होईल. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर येऊ शकते. भाजपला चिंतन करायला लावणारा हा निकाल आहे.

Back to top button