बीड, पुढारी वृत्तसेवा : नरेगात झालेल्या गैर प्रकारांची चौकशी करण्याचे आदेश देऊनही त्याबाबत पारदर्शी चौकशी न केल्याचे मुंबई उच्च न्यायालयान औरंगाबाद खंडपीठाने म्हटले होते. तसेच त्यांची तातडीने बदली करण्याचे आदेशही दिल्यानंतर रविंद्र जगताप यांच्या जागी हिंगोली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात 2011 ते 2019 या कालावधीत नरेगामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याचे सांगत याच्या चौकशीसाठी राजकुमार देशमुख यांनी मागील वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने 21 जानेवारी 2021 रोजी सखोल चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश बीडच्या जिल्हाधिकार्यांना दिले होते.
मात्र अनेक दिवस यावर कारवाई झाली नाही. 25 जून रोजी जिल्हाधिकारी जगताप यांनी शपथपत्र दाखल करुन चौकशी समिती गठीत केल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान जिल्हाधिकार्यांनी शपथपत्र सादर केले. मात्र त्यात नोंदवलेली निरीक्षणे पाहून न्यायालयाने रविंद्र जगताप यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते.
तसेच यांच्या कार्यकाळात या प्रकरणाची पारदर्शी चौकशी होणे शक्य नाही. असे ताशेरे ओढत त्यांची तातडीने बदली करण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील नवीन सुचना आम्ही नवीन जिल्हाधिकार्यांनाच देऊ असे देखील उच्च न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली आहे.
तत्पूर्वीच बुधवारी अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांना बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार जगताप यांच्याकडून त्वरित स्विकारावा असे निर्देश दिले आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर अवघ्या आठ दिवसात जिल्हाधिकार्यांची बदली झाली असून आता दि.18 रोजी होणार्या सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.