उमरगा (उस्मानाबाद), पुढारी वृत्तसेवा : तुरोरी येथे गैरसमजातून जातीय तेढ निर्माण झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. बुधवारी दि १३ रोजी दिवसभर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने दोन्ही समाजात समेट घडवुन आणण्यात आला. यामुळे गावकऱ्यांत समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.
उमरगा तालुक्यातील तूरोरी येथे चार दिवसापूर्वी काही जणांनी एका समाजाच्या समाज सुधारकाच्या फोटोची विटंबना केल्यावरून सोमवारी (दि ११) संबधित विटंबना प्रकरणातील आरोपीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. त्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आश्वासन देवून त्यांची समजूत काढून परत पाठविले होते. संतप्त झालेला जमाव संबंधित व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गावाकडे ट्रकमधुन परत जात असताना जमावाने तुरोरी येथील एका हॉटेलची नासधूस केली, दुचाकी जाळली, दगडफेक केली. त्यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता.
याविरोधात तूरोरी ग्रामस्थांनी (दि.१३) तहसीलदार व पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन महापुरुषांची विटंबना केल्याची खोटी तक्रार करून गावात दहशत पसरविणाऱ्यावर व तोडफोड करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणात तणाव वाढू नये यासाठी पोलीस ठाण्यात व तूरोरी येथे बुधवारी (दि १३ ) दिवसभर दोन्ही समाजातील मान्यवरांच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या. गैरसमजातून झालेल्या या प्रकरणात सामाजिक समतोल बिघडत असल्याचे व कायद्यापुढे कोणाची गय केली जाणार नसल्याचे सांगत दोन्ही गटांना समज दिली व होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली.
दरम्यान, दोन्ही गट वाद संपविण्यासाठी तयार झाले तसेच भविष्यात असा प्रकार होणार नसल्याचे पोलिसांना हमी दिली. त्यानंतर रात्री गावात दोन्ही गटातील मान्यवरांची एकत्रित बैठक घेतली. यावेळी दोन्ही गटातील मान्यवरांनी मत व्यक्त करताना गैरसमजातून हा प्रकार घडला यापुढे असे प्रकार होऊ नये यासाठी समनव्यायाने राहण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून अभिवादन करण्यात आले व गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून दोन्ही गटातील मान्यवरांनी गळाभेट घेऊन वाद मिटल्याचे जाहीर केले.
हेही वाचा