वाशिम; पुढारी वृत्तसेवा : मालेगाव (जि.वाशिम) येथील महावितरणच्या केंद्रातून विद्युत तारा चोरणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ही कारवाई अकोला ते वाशिम जाणाऱ्या रोडवर रिधोरा फाटा येथे सापळा लावून करण्यात आली. मालेगाव पोलिसांनी चोरट्यांकडून २ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
याप्रकरणी महावितरणचे ज्युनियर इंजिनियर शहबाज गोरमिया काजी (वय ३०, मालेगाव, जि. वाशिम), मूळ रा. गुलशन नगर, पांढरकवडा रोड, यवतमाळ) यांनी फिर्याद दिली. शाहरूख खान कादरखान (वय २२ , रा. काटा, ता. जि.वाशिम), आरीफ मलिक सिराजउददीन (वय २३), सोहेल मलिक सिराजउददीन (वय १९, दोन्ही रा.गोटे कॉलेजजवळ बिलाल कॉलनी वाशिम, मूळ पत्ता रा. फतेपूर, जि. मेरठ उत्तरप्रदेश) अशी अटक केल्यांची नावे आहेत. चोरट्यांकडून अॅल्युमिनियमचे तारांचे एकूण ५ नग (५०० कि.ग्रॅ.) अंदाजे किंमत ७० रूपये, आणि चारचाकी वाहन (एम.एच ३७ बी १६०३ ) अंदाजे किंमत २ लाख, असा एकूण २ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, मालेगाव ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष इंगळे, राहुल गंधे, ज्ञानेश्वर राठोड, रवि सैबेवार, नारायण चंदनशिव, कैलास कोकाटे, राजाराम कालापाड, शिवाजी काळे, विजय डोईफोडे, अमोल पवार, जयशंकर पाटील, ज्ञानदेव मात्रे यांनी केली.
हेही वाचा :