मराठवाडा

परभणीला हुडहूडी : दोनच दिवसांमध्‍ये पारा ८ अंशांनी पारा घसरला

अमृता चौगुले

परभणी, पुढारी वृत्तसेवा :  नोव्हेंबरच्या अखेरीस हुडहूडी भरणार्‍या थंडीचे झालेले आगमन डिसेंबरमध्ये राहिले नव्हते. मात्र जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात तापमानाचा पारा एकदम खाली घसरला आहे. १४ अंश सेल्‍सिअसवर राहिलेले तापमान दोनच दिवसात ८ अंशाने घसरून ते 5.7 अंशावर आले आहे. त्यामुळे या हंगामातील हुडहूडी भरणारी दुसरी थंडी अनुभवण्यास येत आहे.

यंदा परतीचा पाऊस उशिराने आला; पण अतिवृष्टीच्या स्वरूपात कोसळला. दिवाळीत जाणवणार्‍या गुलाबी थंडीचेही उशिरानेच आगमन झाले. त्यामुळे डिसेंबरमध्ये ही गुलाबी थंडी जाणवत होती. पहिल्या आठवड्यात पारा एकदम खाली उतरल्याने बोचरी थंडी जाणवत होती. मात्र तिसर्‍या आठवड्यापासून तापमानात कमालीची वाढ होत गेली. जानेवारीच्या पहिल्याच दिवसापासून पुन्हा एकदा गुलाबी थंडीचे आगमन झाले. पहिल्या दोन दिवसात थंड वारे वाहत असल्याने वातावरणातील बदल प्रकर्षाने जाणवत होता.

दरम्‍यान, ५ जानेवारी रोजी 16.2 तर ६ जानेवारी रोजी 15.3 राहिलेले तापमान ७ जानेवारीस १४ अंशावर घसरले. मात्र रविवारी यात 5 अंशाने घसरण होवून ते ९ अंश सेल्सीअस नोंदले गेले. त्यामुळे रविवारचा दिवस कडाक्‍याच्या थंडीचा ठरला. आज ( दि. ९)  तर त्यातही मोठी घसरण होत 5.7 अंशाची नोंद झाली. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांनी शेकोट्या पेटवल्‍याचे दिसून येत आहे.

मागील आठवड्यात तापमान कायम असताना धुक्याची चादर मात्र शहराने ओढून घेतली होती. थंड वार्‍याचा परिणामही जाणवत होता. मात्र प्रत्यक्षात आकड्यातील घसरण दिसत नव्हती. ती रविवारी व सोमवारी 8 अंशाने घसरल्याने हुडहूडी भरणारी थंडी जाणवू लागली आहे.

थंडीच्या लाटेची शक्यता  

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राचे डॉ.के.के. डाखोरे यांनी दिलेल्या हवामान अंदाजानूसार मंगळवारी (दि.9) परभणीसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तर बुधवारी परभणीसह औरंगाबाद जालना व बीड या जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे.

.हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT