यंदाचा डिसेंबर 122 वर्षांतील सर्वात उष्ण; वारंवार येणार्‍या चक्रीवादळांनी पळवली थंडी | पुढारी

यंदाचा डिसेंबर 122 वर्षांतील सर्वात उष्ण; वारंवार येणार्‍या चक्रीवादळांनी पळवली थंडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दरवर्षी कडाक्याची थंडी देणारा डिसेंबर महिना यंदा 122 वर्षांतला सर्वात उष्ण ठरला आहे. हवामानतज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंग, कमकुवत झालेला पश्चिमी चक्रवात, वारंवार तयार होणारी चक्रीवादळे, या कारणांमुळे यंदा हिवाळ्यात आतापर्यंत थंडीच पडली नाही. भारतीय हवामान विभागाने याचे वर्णन ‘क्लायमेट क्रायसिस’ असे केले असून, यावर विशेष अहवाल तयार करीत आहे. यंदा मान्सूनचे आगमन तब्बल 15 दिवस लांबल्याने दिवाळीपर्यंत त्याचा मुक्काम होता.

पुढे दिवाळीनंतरही सतत ढगाळ वातावरण तयार झाल्याने नोव्हेंबर थंडीविना गेला. डिसेंबरमध्येही बंगालच्या उपसागरात वारंवार कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने संपूर्ण देशात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे थंडीसाठी लागणारा पश्चिमी चक्रवात तयार झाला नाही. परिणामी, देशात हिमालयाचा पायथा ते काश्मीर व लडाख वगळता कुठेही डिसेंबर महिन्यात थंडी पडली नाही. त्यामुळे यंदाचा डिसेंबर हा 122 वर्षांतला सर्वात उष्ण महिना ठरला आहे.

किमान व कमाल तापमानात 1 अंशापेक्षा जास्त वाढ
ग्लोबल वॉर्मिंगसह इतर अनेक कारणांमुळे यंदा थंडी कमी पडली. त्यातही किमान तापमानात वारंवार मोठी वाढ झाली. तसेच कमाल तापमानही जास्त वाढल्याने डिसेंबरमध्ये पंखे लावावे लागले. आपल्या देशातील सरासरी किमान तापमान 15.65 ते 21.49 अंंशांवर गेले होते. जे सामान्यपणे 14.44 ते 20.49 अंश इतके असते. तसेच कमाल तापमान 26.5 अंश असते, ते सरासरी 27.32 अंशांवर गेल्याने किमान व कमाल तापमानात 1 ते 1.20 अंशाने वाढ झाल्याने यंदाचा हिवाळा 122 वर्षांतला सर्वाधिक उष्ण ठरला.

कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पळाली थंडी
यंदा जूनपासून डिसेंबरपर्यंत बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात वारंवार कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने सतत बाष्पयुक्त वारे तयार होऊन ढगाळ वातावरण तयार झाले. तसेच पाकिस्तान व अफगाणिस्तानकडून उत्तर भारतात थंडीसाठी तयार होणारे पश्चिमी चक्रवात तयारच झाले नाहीत, त्यामुळे यंदा उत्तर भारतातही थंडी कमी पडली. किमान तापमानात देशभरात सरासरी 0.79 ते 1.21 अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे; तर कमाल तापमानात सरासरी 1.20 ते 1.30 अंशाने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे देशभरात कुठेच तीव्र थंडीची लाट आली नाही, त्यात महाराष्ट्रात कुठेही थंडी नव्हती.

डिसेंबरमध्ये पाऊस घटला!
1901 मध्येही असे वातावरण होते. त्यानंतर 2008 व 2016 मध्ये किमान सरासरी तापमान (12.7) तसेच 1958 मध्ये (12.47 अंश) होते. उत्तर-पूर्व भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारतात डिसेंबरमध्ये पाऊसही कमी झाल्याची नोंद आहे. डिसेंबरमध्ये सरासरी पाऊस 13.6 मि.मी. पडतो. त्यात तब्बल 83 टक्के घट झाली. मध्य भारतात 77 टक्के, तर दक्षिण भारतात 79 टक्के पाऊस कमी पडला.

यंदा बंगालच्या उपसागरात वारंवार कमी दाबाचे पट्टे तयार झाल्याने तिकडून बाष्पयुक्त वारे देशभर गेले, त्यामुळे ढगाळ वातावरण तयार झाले. थंडीसाठी पोषक ठरणारे पश्चिमी चक्रवात उत्तर भारतात यंदा तयार झाले नाहीत. यासह ग्लोबल वॉर्मिंग हेदेखील महत्त्वाचे कारण आहे.

               – डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक, भारतीय हवामान विभाग, दिल्ली

यंदा उत्तर भारतात तीव्र पश्चिमी चक्रवात तयारच झाले नाहीत. त्यामुळे यंदाचा डिसेंबर हा 122 वर्षांतील सर्वात उष्ण ठरला. किमान व कमाल तापमानात 0.79 ते 1.21 अंशाने वाढ झाली. जानेवारीतदेखील थंडीचे कमी दिवस राहतील, असा अंदाज आहे.

                                      – ओ. पी. श्रीजित, वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ, पुणे वेधशाळा

Back to top button